Chinchwad news: विरोधी पक्षनेते राजू मिसाळ ‘पीपीई’ किट परिधान करून थेट कोविड वॉर्डात !

रुग्णांची केली विचारपूस; कोविड सेंटरमधील समस्यांकडे वेधले आयुक्तांचे लक्ष

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आज (गुरुवारी) ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरची पाहणी केली. पीपीई किट परिधान करून वार्डात जावून रुग्णांची विचारपूस केली. समस्या जाणून घेतल्या. तसेच निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत, याकडे मिसाळ यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग चालू आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात रोज हजार बाराशेच्या घरात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यासाठी मनपा प्रशासनाने 17 ठिकाणी कोविड सेंटर चालू करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे राज्य शासनाने आण्णासाहेब मगर स्टेडीअम येथे जँम्बो हॉस्पिटल तर ऑटो क्लस्टर येथे कोविड सेंटर चालू केले आहे.

ऑटो क्लस्टर या ठिकाणच्या रुग्णांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे येत होत्या. त्यामुळे या सेंटरला भेट दिली असता या कोविड सेंटरमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.

रुग्णांना वेळेवर चहा, नाश्ता, जेवण मिळत नाही. मिळालेले जेवण निकृष्ट दर्जाचे आहे. त्याच प्रमाणे या सेंटरच्या एका कोप-यात बायो मेडीकल वेस्टज ( पीपीई किट, मास्क, ग्लोज इ.) चार दिवसापासून पडून असल्याचे तेथील रुग्णांशी बोलताना समजले. सदरची बाब अतिशय गंभीर आहे.

कोरोना बाधित रुग्णांना सकस आहार देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तरी सुध्दा त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरविले जात आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती अजून बिघडू शकते.

सर्वच कोरोना कोविड सेंटरवरील रुग्णांना वेळवर चहा, सकस नास्ता व जेवण देण्याचे निर्देश देण्यात यावेत. त्याच प्रमाणे कोविड सेंटरमधील बायो मेडिकल वेस्टज् त्वरीत उचलण्यात यावे, अशी सूचना मिसाळ यांनी आयुक्तांना केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.