Chinchwad news: चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आवास योजनेच्या सोडतीला विरोध; राष्ट्रवादीची निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – पुण्याचे पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी कोणतेही विकास काम केले नसल्याचा आरोप करत त्यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या सोडतीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला.तसेच त्याविरोधात चिंचवड येथे निदर्शने केली. काळे झेंडे हातात घेऊन भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पंतप्रधान आवास योजनेची सोडत राजशिष्टाचाराप्रमाणे पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते काढण्याची राष्ट्रवादीची मागणी होती. पण, ती फेटाळण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या सदनिकांसाठी आज (सोमवारी) तीन वाजता सोडत काढली जाणार होती.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी तीन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे.

मात्र, पाटील यांच्या हस्ते सोडत काढण्यास विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक राजू बनसोडे, प्रवीण भालेकर, नगरसेविका उषा काळे, वर्षा जगताप, कविता खराडे, माधव मुळे आदी सहभागी झाले होते.

भाजप आयत्या कामाचे श्रेय घेत आहे. पालिकेतील सत्ताधा-यांचे करायचे काय खाली डोके वर पाय, अशा जोरदार घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.