Padmashri Girish Prabhune : अनुभवाधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज – पद्मश्री गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज :  “पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे!” असे विचार ज्येष्ठ समाजसेवक आणि (Padmashri girish prabhune) साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले.

 

 

कलारंजन प्रतिष्ठान आयोजित गुरुगौरव पुरस्कार सोहळ्यात जबीन इस्माईल सय्यद (पिंपरी-चिंचवड मनपा शाळा क्रमांक 94, श्रमिकनगर) आणि अपर्णा योगेश नांदूरकर (लालबहादूर शास्त्री हायस्कूल, खडकी) या शिक्षिकांना सन्मानित करताना प्रभुणे बोलत होते. ह.भ.प. किसनमहाराज चौधरी अध्यक्षस्थानी होते. तर, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले आणि कार्यवाह शिरीष पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.(Chinchwad News) याप्रसंगी शिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पूनम गुजर, रामदास मेचे, संतोष जंगम, डॉ. अविनाश वाळुंज, राजश्री भुजबळ, आनंदी जंगम, प्रशांत कामथे, वंदना आहेर, वंदना इन्नानी, शारदा माळी, गणेश लिंगडे या गुरुजनांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीत नवे प्रयोग केले. या प्रभृतींची नावे शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांना देण्यात आलीत; पण त्यांचे प्रयोग स्वीकारले गेले नाहीत. त्यामुळे भारतीयांनी दीडशे वर्षांत जगाच्या ज्ञानात नवी भर घातली नाही किंवा नोबेल पारितोषिक विजेते निर्माण होऊ शकले नाहीत!”

 

 

 

किसन महाराज चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “महर्षी व्यास यांच्या प्रतिभेने मानवी जीवनातील सर्व गोष्टींना स्पर्श केला म्हणून त्यांना ‘गुरू’ मानले जाते. सत्य, सदाचार, शांती, प्रेम आणि अहिंसा या पाच मूल्यांना प्राधान्य देत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना विकसित करणे हे शिक्षकांचे आद्यकर्तव्य असले पाहिजे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमोद सोनवणे यांनी संवादिनीवर सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविकातून कलारंजनच्या पंधरा वर्षांच्या कालावधीतील उपक्रमांची माहिती दिली. पुरस्कारार्थींनी कृतज्ञतापर मनोगते व्यक्त केलीत. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. तर शिरीष पडवळ यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.