Chinchwad News : व्यक्त होण्यासाठी फोटोग्राफी हे उत्तम माध्यम – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

'लॉकडाऊन फोटोग्राफी' स्पर्धेत प्रथमेश नौगण प्रथम

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊन काळात घराबाहेर पडण्यास मनाई असताना फोटोग्राफीसारख्या स्पर्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यक्त होण्यासाठी फोटोग्राफी हे उत्तम माध्यम आहे, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. देवदत्त फोटोग्राफी स्कूल आणि एमपीसी न्यूज यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लाॅकडाऊन फोटोग्राफी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

चिंचवड येथील हॉटेल अन्नपूर्णाच्या रंगोली बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या एका छोटेखानी शानदार समारंभास पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, संचालक हृषीकेश तपशाळकर, संचालक अनिल कातळे, आण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक, पिंपरी-चिंचवड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, ज्येष्ठ पत्रकार राजन वडके,  देवदत्त फोटोग्राफी स्कूलचे देवदत्त कशाळीकर आणि ‘एमपीसी न्यूज’चे पत्रकार व इतर कर्मचारी तसेच पारितोषिक विजेते उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. देवदत्त फोटोग्राफी स्कूल आणि एमपीसी न्यूज यांच्या राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेचं कौतुक करत सर्व विजेत्यांचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, लाॅकडाऊन काळात घराबाहेर पडण्यास मनाई असताना अशा स्पर्धा खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यक्त होण्यासाठी फोटोग्राफी हे एक चांगल माध्यम आहे. कोणतीही परिस्थिती ही अंतिम असतं नाही. आनंद हा आपल्या आतच असतो तो फक्त शोधण्याची गरज आहे.

पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करताना पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

आपले विचार पटवून देण्यासाठी त्यांनी संत कबीर यांचे दोहे आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे दाखले दिले. एकटेपणा सृजनात्मक विचारांना जन्म देतो आणि सच्चिदानंद हाच खरा ईश्वर आहे. फोटोग्राफीच्या माध्यमातून हा सच्चिदानंद मिळवता येईल, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

​पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या भाषणाचा ​फेसबुक​ लाईव्ह व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

प्रास्ताविक स्पर्धेचे परीक्षक व देवदत्त फोटोग्राफी स्कूलचे संचालक देवदत्त कशाळीकर यांनी केले. ‘लॉकडाऊन फोटोग्राफी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला. देशाच्या कानाकोपऱ्यातून 823 प्रवेशिका प्राप्त झाल्या. प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन आम्ही बक्षिसांमध्ये सहर्ष भरघोस वाढ केली. स्पर्धेच्या परीक्षणाचे काम खूप अवघड झाले होते, कारण प्रतिसाद खूप मोठा होता. त्यामुळेच कुणाचाही उत्तम फोटो डावलला जाऊ नये, या उद्देशाने पारितोषिकांची संख्या तब्बल 12 पारितोषिकांनी वाढवण्यात आली. तसेच स्पर्धा परीक्षणात मोबाईल व डीएसएलआर असा भेदभाव न ठेवता फोटोग्राफरची ‘थॉट प्रोसेस’ विचारात घेतली होती, असे कशाळीकर म्हणाले.

आयुष्यातील निखळ आनंद देणारे काही क्षण, त्यातील उत्तम प्रकाशयोजना, उत्तम ले आऊट, हे उत्तेजनार्थ सर्व फोटोंचे बलस्थान ठरले. एक परीक्षक म्हणून मला अजून खूप उत्तम छायाचित्रे पाठविणाऱ्या सर्व छायाचित्रकारांचे कौतुक करायला आवडेल, असे मत देवदत्त कशाळीकर यांनी व्यक्त केले.

स्पर्धेतील अन्य पारितोषिक विजेत्यांबरोबर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार

याप्रसंगी ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांनी ‘एमपीसी न्यूज’च्या बारा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, बरोबर 12 वर्षांपूर्वी म्हणजे 22 जुलै 2008 ला आम्ही ‘माय पिंपरी चिंचवड डॉट कॉम’ या नावाने शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल सुरू केले. त्यावेळी ‘ऑनलाईन मीडिया’ या शहरवासीयांसाठी पूर्णपणे नवीन होता. शहरात ऑनलाईन मीडिया रुजवण्यापासूनचे आव्हान तेव्हा आमच्यापुढे होते. निर्भिड, निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह पत्रकारिता करीत एमपीसी न्यूजच्या टीमने हे आव्हान केवळ स्वीकारलेच नाही तर समर्थपणे पेलले असल्याचे ते म्हणाले.

जगभरातील 198 देशांतील 6,620 शहरांमधील तब्बल 88 लाख 2 हजार 820 वाचकांपर्यंत (युनिक व्हिजिटर्स) पोहचण्याचे आणि त्यांच्या पसंतीस उतरण्याचे तसेच विश्वासास पात्र ठरण्याचे भाग्य एमपीसी न्यूजला मिळाले आहे. शहर व परिसराची बित्तंबातमी देणारी अग्रगण्य वृत्तसेवा म्हणून एमपीसी न्यूजचा नावलौकिक झाला आहे. सुरूवातीला महिन्याला काही हजार हिट्स मिळायच्या आता महिन्याला काही कोटी हिट्स मिळतात, याचे सर्व श्रेय आम्ही आमच्या दर्शकांना देतो, असे विवेक इनामदार म्हणाले.

‘एमपीसी न्यूज’चे क्राईम रिपोर्टर श्रीपाद शिंदे यांनी नवनिर्वाचित पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा भारतीय पोलीस सेवेपर्यंतचा प्रवास व त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. देवदत्त कशाळीकर यांनी स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांचे फोटो डिजिटल स्क्रीनवर दाखवत त्याचा अर्थ समजावून सांगितला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व ब‌क्षिसाची रोख रक्कम देण्यात आली. ‘लॉकडाऊन फोटोग्राफी’ स्पर्धेमध्ये निगडी यमुनानगर येथील प्रथमेश नौगण यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वितीय क्रमांक रावेत येथील ओजस वडके व ऋतुराज झगडे यांनी मिळवला आहे. चिंचवडच्या डॉ. प्रिया गोरखे व सातारा येथील सचिन राजोपाध्ये यांनी तृतीय क्रमांक पटकवला आहे. या व्यतिरिक्त 15 छायाचित्रांची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.

पारितोषिक समारंभाचा फेसबुक लाईव्ह व्हिडीओ

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे स्वागत करताना एमपीसी न्यूजचे संचालक अनिल कातळे व हृषीकेश तपशाळकर. त्यावेळी देवदत्त कशाळीकर व विवेक इनामदार उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे.

• प्रथम क्रमांक – प्रथमेश नौगण [यमुनानगर, निगडी]

• व्दितीय क्रमांक-ओजस वडके [रावेत] व ऋतुराज झगडे [घरकुल, चिखली]

• तृतीय क्रमांक – डॉ. प्रिया गोरखे [चिंचवड] व सचिन राजोपाध्ये सातारा]

उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांची नावे

• दत्ता गरुड [खराडी, पुणे]

• हर्षवर्धन देशमुख [वाकड]

• जॉर्ज अरसुड [कासारवाडी]

• मंगेश प्रसादे [आळंदी]

• मोहित शिंदे [सिंहगड रोड, पुणे]

• पायल भयानी [घाटकोपर, मुंबई

• प्रशांत कांबळे [डांगे चौक]

• रौनक तेजवानी [आकुर्डी

• समाधान गावडे [धानोरे, खेड]

• स्नेहा वराडे [पार्क स्ट्रीट, वाकड]

• वृषाली आपटे संभाजीनगर, चिंचवड]

• अरुण पवार (निगडी]

• कोमल राऊत [माहीम, पालघर]

• अभिजित घाडगे [पिंपळे गुरव]

• चिन्मय कवी [चिंचवड]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.