Chinchwad News: जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी दिव्यांग नागरिकांची निदर्शने!

एमपीसी न्यूज – दिव्यांग नागरिकांचे कामे वेळेत होत नसल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमस्थळी प्रहार संघटनेने निदर्शने केली. त्यावर यापुढे कोणत्याही दिव्यांगाचे काम थांबणार नाही अशी ग्वाही नागरवस्ती विभागाच्या उपायुक्तांनी दिली. त्यानंतर सर्व दिव्यांग बांधव कार्यक्रमासाठी सभागृहात गेले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वेळोवेळी सूचना देऊनही दिव्यांगांची कामे होत नाहीत. त्यामुळे प्रहार अपंग क्रांती संघटनेने गेटवर थांबून निदर्शने केली. एकही दिव्यांग नागरिक कार्यक्रम स्थळी गेला नाही. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. प्रथमता: दिव्यांग कक्ष सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, अण्णा बोदडे यांनी येऊन दिव्यांग बांधवांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अयशस्वी झाला.

त्यानंतर उपायुक्त अजय चारठाणकर यांनी संबंधित सर्व अधिका-यांना घटनास्थळी बोलावून घेतले. दिव्यांग नागरिकांशी चर्चा करून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यापुढे कोणत्याही दिव्यांचे काम थांबणार नाही अशी ग्वाही दिली. त्यामुळे दिव्यांगाचे नेते मानव कांबळे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मुदत दिली. महापालिकेने घेतलेल्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून शुभेच्छा देऊ असे आवाहन कांबळे यांनी केले. त्यानंतर सर्व दिव्यांग बांधव सभागृहात गेले. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्ष संगीता जोशी, रामचंद्र तांबे, राजाराम पाटील, रमेश भिसे, ज्ञानदेव नारखेडे, अशोक भोपळे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू विटेकर, संतोष सोनवणे, चंदन बरूवा यांच्यासह तीनशे ते चारशे दिव्यांग नागरिक उपस्थित होते. दरम्यान, महापालिकेने ठेवलेल्या जेवणाला दर्जा नसल्याचा आरोप करत जेवणावर बहिष्कार घातला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.