chinchwad News : पिंपरी चिंचवड शासकीय आयटीआय राज्यात मॉडेल करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार- आमदार आण्णा बनसोडे

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र राज्यात मॉडेल म्हणून विकसित करण्याबाबत आग्रही मागणी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केली असल्याची माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

आमदार बनसोडे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची भेट देऊन पाहणी केली होती.

यावेळी आमदार बनसोडे यांनी सर्व परिसरासह व प्रशिक्षण केंद्राची कार्यशाळा, विद्यार्थी पट संख्या, शिक्षक (शिल्प निदेशक) व शिक्षकेतर कर्मचारी पदांचा आणि एकूण परिस्थितीचा आढावाही घेतला होता.

३८ शिक्षक (शिल्प निदेशक) पदे मंजूर असून या पैकी २२ पदे रिक्त असून औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील एकूण समस्या व अडचणी प्राचार्य जगताप यांच्याकडून आमदारांना समजून घेतल्या.

भेटी दरम्यान झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य व शिक्षकांना आमदार बनसोडे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

पिंपरी चिंचवड शहराची उद्योग नगरी म्हणून जगभर ओळख असून या उद्योग नगरीतील स्थानिक युवकांना रोजगारभिमुख व कौशल्यपूर्ण औद्योगिक प्रशिक्षण उपलब्ध व्हावे व प्रशिक्षणानंतर तात्काळ नोकरी मिळावी म्हणून काळानुसार अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे.

MIDC मधील उद्योगांना आवश्यक असे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध व्हावे व स्थानिक युवकांना रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून प्रगत व कौशल्य पूर्ण प्रशिक्षण शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये मिळाणे गरजेचे आहे.

म्हणून, हे प्रशिक्षण केंद्र राज्यात मॉडेल म्हणून विकसित करण्याचा मानस असून शासन दरबारी पाठपुरावा बनसोडे यांनी सुरु केला आहे.

मॉडेल आयटीआयमुळे विद्यार्थांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाच्या मोठया संधी निर्माण होणार असल्याने बनसोडे यांचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास शहारातील युवकांना चांगल्या व नामांकित उद्योगांमध्ये नोकरीच्या मोठया संधी निर्माण होणार आहेत.

युवाशक्तीला योग्य मार्गदर्शन व कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळाल्यास क्रांतिकारी प्रगती घडवून आणण्याची ताकद युवा शक्तीत आहे.

या युवा शक्तीला व्यसनाधीनता व गुन्हेगारी पासून पारावृत करणे हे मोठे आव्हान असून यासाठी शासन युवकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे.

शहरातील युवक रोजगार पासून वंचित राहणार नाही यासाठी ‘मागेल त्याला काम’ ही योजना लवकरच सुरु करणार असल्याची माहिती बनसोडे यांनी दिली आहे.

कोविड प्रादुर्भावामुळे अल्प कालावधीचे विधिमंडळ सत्र असल्याने शहरातील प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचेही आमदार बनसोडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.