Chinchwad News : Pimpri News: कोरोना रुग्णांच्या बिलांमध्ये  नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई : पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांवरील उपचारांच्या बिलांबाबत शासनाच्या नियमांचे उल्लंघन कोणीही करु नये; अन्यथा कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल. वैद्यकीय सेवेला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाचा सहभाग महत्वाचा असतो. मात्र, अवाजवी बिलांसारख्या तक्रारी उद्भवू नयेत याची दक्षता रुग्णालयांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

कोविड-19 अंतर्गत राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या अधिसुचनेनुसार खासगी रुग्णालयांनी वैद्यकीय बिलांची आकारणी करण्याबाबत तसेच महापालिकेने नेमलेल्या लेखापरिक्षण पथकाबरोबर समन्वय ठेवण्यासाठी आज (शनिवारी) शहरातील कोविड-19 उपचार करणा-या खासगी रुग्णालयांच्या डॉक्टर तथा संचालकांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. सुनीता साळवे, बील पडताळणी समिती प्रमुख तथा सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता विजय भोजने आदी उपस्थित होते.

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर आकारण्यात येणा-या वैद्यकीय बिलांचे शासन निर्णयानुसार पुर्वलेखापरिक्षण केले जाणार आहे. त्यासाठी रुग्णालयांनी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन होणार नाही, याबाबत खासगी रुग्णालयांनी दक्षता घेण्यात यावी.

कोरोना महामारीमध्ये अनेकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले आहे. अनेकांना मानसिक, शारीरिक त्रास सोसावा लागला. अशा वेळी मानवी संवेदना जागृत ठेवून प्रत्येकाने सेवा दिली पाहिजे, असे नमूद करुन महापालिका आयुक्त पाटील म्हणाले, लोकभावना समजून घेण्याची नितांत गरज आहे.

रुग्ण दगावल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना बिलाकरीता अडवणूक करणे योग्य नाही. कोरोना रुग्णांवरील उपचारांचे दर शासनाने निश्चित करुन दिले आहेत. या दराप्रमाणे रुग्णालयाने बिल दिले पाहिजे.

बिलाबाबत तक्रारी उद्भवू नयेत यासाठी बिलांचे प्री-ऑडीट करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालयाने वेळेत बिल तयार करावे, ते एकत्रित असावे. योग्य कारणासाठी रुग्णालयांना आवश्यक असल्यास महापालिकेचे सहकार्य असेल. महापालिका प्रशासनाला लेखापरिक्षणाबाबत रुग्णालयाने सहकार्य करावे, असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, बिल पडताळणी समिती प्रमुख श्रीकांत सवणे यांनी बिलांचे प्री ऑडीटबाबत उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.