Chinchwad News: प्रदुषण वाढतंय! नागरिकांनी ‘इलेक्ट्रिक’ वाहनांना प्राधान्य द्यावे – आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज – ”राज्यात प्रदुषण वाढत आहे. वाढते प्रदुषण रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी’ आणली आहे. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या ठरावीक कंपन्यांना मी भेट देत आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असून नागरिकांनी जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहने घ्यावीत”, असे आवाहन राज्याचे पर्यटन, पर्यावरण, वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

पर्यावरण मंत्री ठाकरे आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. चिंचवड एमआयडीसी येथील कायनेटीक ग्रीन एनर्जी अ‍ॅण्ड पॉवर सोल्युशन आणि टाटा मोटर्स कंपनीला त्यांनी भेट दिली. चिंचवड येथे ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री ठाकरे म्हणाले, ”राज्याची इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी आली आहे. लोकांनी जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहने घ्यावीत. त्यासाठी महाराष्ट्राने धोरण जाहीर केले आहे”.

”राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या ठरावीक कंपन्यांना मी भेट देत असून त्यांच्यासोबत चर्चा करत आहे. कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने उत्पादन केले जाते. उत्पादन क्षमता किती आहे, याची माहिती घेत आहोत. इलेक्ट्रिक वाहने बाजारात आल्यानंतर किती लोकांना ही वाहने वापरण्यासाठी प्रोत्साहित करु शकू, किती लोक इलेक्ट्रिक वाहने घेऊ शकतील. याची चाचपणी केली जात आहे. राज्यात प्रदुषण वाढत आहे. त्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असल्याचे” मंत्री ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, पूरग्रस्त भाग, बाकीच्या विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य करणे टाळले. पुण्यामध्ये पत्रकार परिषद असून तेथे सविस्तर बोलणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.