Chinchwad News: पुणे-लोणावळा लोकल पूर्ण क्षमतेने सुरु करा,पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोकल सेवा पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने सुरु करावी. तसेच पुणे ते लोणावळा या मार्गावरील तिस-या आणि चौथ्या लोहमार्गाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी शुक्रवारी (दि. 3) चिंचवड रेल्वे स्थानकावर पाहणी दौरा केला. यावेळी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाने त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष ईक्बाल भाईजान मुलाणी, बबन साबळे, रवींद्र सरदेसाई, रावसाहेब चंद्रकांत थोरात, सर्जेराव भोसले, संजय गाढवे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. शहरात सुमारे 35 लाख नागरिक वास्तव्यास आहेत. हे सर्व नागरिक कामगार वर्गातील आहेत. मागील सुमारे दोन वर्षांपासून लोकल सेवा बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कामगार वर्गासाठी नियमित लोकल सेवा सुरु करणे आवश्यक आहे.

पुणे ते मुंबई या मार्गावर रेल्वेने नियमित प्रवास करणा-या प्रवाशांना मासिक पास देण्यासही सुरुवात करावी. पिंपरी चिंचवड शहराच्या आजूबाजूच्या सुमारे 15 किलोमीटर परीसरात नागरीकरण झाले आहे. त्यातील बहुतांश नागरिक हे परराज्यातील आहेत. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी पुणे अथवा लोणावळा रेल्वे स्थानकावर जावे लागते. जर चिंचवड रेल्वे स्थानकावर काही रेल्वे गाड्यांना थांबे दिल्यास या नागरिकांची सोय होईल.

चेन्नई, महालक्ष्मी, सिद्धेश्वर, डेक्कन क्वीन, इंद्रायणी, प्रगती, डेक्कन एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्यांना चिंचवड रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.