Chinchwad News : विजेच्या लपंडावाने पूर्णानगरवासीय हैराण

एमपीसीन्यूज : महापालिका प्रभाग क्रमांक 11 मधील पूर्णानगर येथील नागरिक गेल्या काही दिवसांपासून विजेच्या लपंडावाने पुरते हैराण झाले आहेत. विजेच्या समस्येबाबत महावितरणच्या स्थानिक अधिकारी आणि वायरमन यांच्याकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, परिस्थिती आजही ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पूर्णानगर विकास समितीचे अध्यक्ष विकास गर्ग म्हणाले, पूर्णानगर परिसराकडे महावितरणाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. कारण या भागात गेल्या दोन वर्षांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. विजेअभावी स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या. त्यावर तात्पुरती कार्यवाही करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येतो.

मात्र, काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे पाहायला मिळते. या सर्व प्रकारामुळे पूर्णानगरकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्वात जास्त नुकसान विद्यार्थ्यांचे होत आहे. कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करावा लागत आहे. अशावेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होते. काही दिवसांत परीक्षा सुरु होणार असल्याने वीजपुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे.

तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा विजेच्या समस्येमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गृहिणी, उद्योजक, व्यापारी यांनाही वीजपुरवठा खंडित झाल्यास गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

या समस्येपासून पूर्णानगरला मुक्त करण्यासाठी महावितरणच्या आकुर्डी विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश कवडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले असल्याची माहिती विकास गर्ग यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.