Chinchwad News : रेसिंग कार, रोबोट, विमान…! ; प्रात्यक्षिके पाहून हरखली कामगार वस्तीतील मुले

एमपीसीन्यूज : रेसिंग कार, रोबोट, विमान, रॉकेट, कॅमेरा ड्रोन अशी एकापेक्षा एक सरस वैज्ञानिक उपकरणे आणि या उपकरणांची प्रात्यक्षिके पाहून मोहननगर परिसरातील विद्यार्थी हरखून गेले. तसेच अशी उपकरणे तयार करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धारही काही विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती मोहननगर शिवसेनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमात इंजिनिअरिंग आणि वैज्ञानिक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक उपकरणे बनविण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.

मोहननगर येथील जिजामाता सांस्कृतिक भवन येथे आयोजित या शिबिराला परिसरातील विद्यार्थी आणि बालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

शिवसेना नगरसेविका मीनल यादव आणि शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांच्यावतीने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या वेळी ‘जेएसपीएम’च्या मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रमुख अविनाश बडदे आणि नगरसेविका यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ व  स्वामी विवेकानंद  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ‘जेएसपीएम’चे संतोष पाचपुते व विजयश्री मेहता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी ‘जेएसपीएम’च्या टीम ध्रुवचे विक्रांत पाटील, देवेंद्र पाटील, संजय भालेकर, सिद्धार्थ जाधव, वेदांत आमले, हर्षल वाणी, तपन पाटील, राहुल मोरे, शंतनू खचणे या विद्यार्थ्यांनी स्वत: बनविलेल्या रेसिंग कार, रोबो, विमान, रॉकेट , कॅमेरा ड्रोन अशा वैज्ञानिक उपकरणांची प्रात्यक्षिके सादर केली.

ही प्रात्यक्षिके पाहताना मोहनगर आणि परिसरातील विद्यार्थी हरखून गेले होते. अनेकांनी तर अशी प्रात्यक्षिके पहिल्यांदाच अनुभवली.

दरम्यान, प्रात्यक्षिके सादर केल्यानंतर उपस्थित विध्यार्थ्यांना ध्रुव टीमच्या सदस्यांनी विज्ञानावर आधारित प्रश्न विचारले. योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

‘सध्याच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान संपादन करण्यापेक्षा वैज्ञानिक होण्याचे स्वप्न पाहावे. तसेच ते सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करावा. ‘जेएसपीएम’च्या टीम ध्रुवच्या सदस्यांप्रमाणे मोहननगर आणि परिसरातील विद्यार्थ्यांनीही स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन नगरसेविका मीनल यादव यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.