Chinchwad news: नोंदित बांधकाम कामगारांना मिळणार गृहोपयोगी साहित्यांचा संच

राज्य सरकारचा निर्णय ; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर पाठीवर बिऱ्हाड घेऊन स्थलांतर करणाऱ्या बांधकाम कामगारांना घरगुती आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सर्व नोंदित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्यांचा संच देण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार नोंदित बांधकाम कामगारांना 17 प्रकारच्या 30 नग गृहोपयोगी साहित्य मोफत देण्यात येणार आहेत.

बांधकाम कामगार हा आज या बांधकाम साइटवर, तर उद्या त्या बांधकाम साइटवर कामाच्या शोधात स्थलांतर करत असतो. हे करत असताना पोटासाठी लागणारे अन्न शिजवण्याची साधने सुद्धा त्याच्याकडे नसतात. ही बाब लक्षात घेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांनी बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला संपर्क साधला.

या मंडळाकडे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शेकडो कोटी रुपये पडून आहेत. तरीही त्याचा विनियोग केला जात नाही. त्यामुळे आमदार जगताप यांनी मंडळाच्या सचिवांसोबत चर्चा करून नोंदित बांधकामगारांना गृहोपयोगी साहित्य देण्याची सूचना केली.

यासंदर्भात आमदार जगताप यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला लेखी पत्रही दिले. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, मंडळाने नोंदित बांधकाम कामगारांना 17 प्रकारच्या गृहोपयोगी साहित्याचे 30 नग मोफत देण्याच्या योजनेची घोषणा केली आहे.

18 जानेवारी 2021 ला याबाबतचा शासन आदेशही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हजारो नोंदित बांधकाम कामगारांना संसारासाठी मोठा आधार मिळणार आहे.

बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य मिळावे यासाठी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक जयंत शिंदे यांनी देखील आमदार जगताप यांच्यामार्फत मोठा पाठपुरावा केला होता. या मागणीचा शासन आदेश निघाल्याने जयंत शिंदे यांनीही समाधान व्यक्त केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.