Chinchwad News : पोलिसांच्या पाल्यांसाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनच्या वतीने मोफत ‘आयडीयल स्टडी ॲप’चे वितरण

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउन यांच्या वतीने मोफत ‘आयडीयल स्टडी ॲप’ देण्यात आले.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते गुरुवारी (दि.24) या ॲपचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, पोलीस अधिकारी व अंमलदार अहोरात्र समाजाच्या सुरक्षा व लोकांच्या सेवेसाठी आपले कर्तव्य बजावत आहेत‌. दिवसा बंदोबस्त आणि रात्री पहारा या भुमिकेत ते असतात. पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या कुटुंबाकडे व स्वास्थाकडे दुर्लक्ष होते.

त्यामुळे पोलीस अधिकारी व अमलदार यांना मुलांच्या भविष्यासाठी पुरेशा उपाययोजना करता येत नाही. कोराना संसर्गाच्या काळात पोलीसांनी नागरिकांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य वजावले आहे आणि या कार्याबद्दल अजुनही नागरिक पोलीसांचे कौतुक करत आहेत.

पोलीसांच्या चांगल्या कामगिरी बद्दल कोणी पुढाकार घेत असेल तर आमच्यात आणखी जोश निर्माण होतो. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउन यांच्या वतीने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पाल्यांना देण्यात येणारे आयडीयल ॲपमुळे पोलीस पाल्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.

इयत्ता दहावी शिक्षणाचा महत्वाचा पाया असून या आयडीयल ॲपचा वापर करून पोलीस पाल्यांनी अधिकाधिक चांगले मार्क मिळवून यशस्वी व्हावे असा सल्ला कृष्णप्रकाश यांनी दिला.

आधुनिक  स्मार्ट आयडीयल ॲपमुळे नक्कीच सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पाल्यांना मोठा फायदा होणार आहे. सर्व पोलीस पाल्यांनी या ॲपच्या माध्यमातून आपला फायदा करून घ्यावा, असे अवाहन परिमंडळ-1 चे पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष अनिल नेवाळे म्हणाले, पोलिसांनी कोरोनाच्या कठीण काळात आपल्या जीवाची पर्वा नकरता कर्तव्य बजावले. संपुर्ण समाजाची जवाबदारी सध्या पोलिसांवर आहे.

याकाळात त्यांचे कुटूंवियाकडे व पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याकरीता त्यांचेकडे पुरेसा वेळ नाही. आयडीयल ॲपच्या माध्यमातून त्यांचे शिक्षण सहजसोपे होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमासाठी परिमंडळ-1 चे पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 राजाराम पाटील, कल्याण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेद्र गौर, तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष अनिल नेवाळे, रोटरी क्लब देहूरोडचे अध्यक्ष अतुल कामत, चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पाल्य तसेच रोटरी क्लबचे मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.