Chinchwad News : वेगवेगळ्या 65 गुन्ह्यातील दीड कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एकच्या हद्दीतील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, चोरी झालेल्या तब्बल 65 गुन्ह्यातील 68 वेगवेगळ्या वर्णनाचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. 65 गुन्ह्यातील मुद्देमालाची किंमत एक कोटी 51 लाख आहे.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे शुक्रवारी (दि. 26) झालेल्या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, राम जाधव, प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फिर्यादी नागरिक उपस्थित होते.

वाटप केलेल्या मुद्देमालामध्ये 21 लाख 97 हजारांचे 11 सोन्या चांदीचे दागिने, 34 लाख 85 हजारांचे 43 दुचाकी आणि एक तीनचाकी रिक्षा, 28 लाख 50 हजारांची दोन ट्रक आणि एक अल्टो कार, 1 लाख 77 हजारांचे 5 मोबाईल फोन, म्हाळुंगे एमआयडीसी मधील दरोडा व घरफोडी झालेल्या 64 लाख 56 हजारांचा ऑटो स्पेअर पार्टचा समावेश आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “लोकाभिमुख प्रशासन तयार करण्यासाठी लोकांच्या गरजा, अपेक्षा समजून घेणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे लोकांच्या अपेक्षेप्रमाणे टीमवर्क करणे देखील महत्वाचे असते. योजिक असणं महत्वाचं आहे. माझे सर्व पोलीस योजिक आहेत. पोलीस खूप कष्ट करून गुन्हे उघडकीस आणतात, मुद्देमाल जप्त करतात. पण तो मुद्देमाल परत मूळ मालकांना मिळाला नाही तर पोलिसांनी केलेल्या कामाचे चीज होत नाही. त्यामुळे जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकाला परत करणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

कोणतेही कार्य एकट्याने करता येत नाही. टीमवर्क महत्वाचं आहे. अनेक वर्षे काही लोकांना वाट पाहावी लागली. त्याबद्दल दिलगिरी. यापुढे असं होणार नाही. लवकरात लवकर मुद्देमाल परत देण्यासाठी काम करणार. गुन्हेगारांना सळो की पळो करण्यासाठी प्रयत्न करणार. गुन्हेगारांना स्थानबद्ध करणे, गुन्हे उघडकीस आणणे, आरोपींना अटक करणे, मुद्देमाल जप्त करणे, योग्यरीत्या तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे, नागरिकांना न्याय मिळवून देणे एवढं काम पोलिसांना करावं लागतं. खरोखर गुन्हेगार असणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी. जातीधर्मात तेढ निर्माण होऊ न देणे, गैरमार्गाला जाणाऱ्यांना रोखणे, समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे पाहिले आणि शेवटचे कर्तव्य आहे. शहराला राहण्यायोग्य बनवणे हे देखील आमचे उद्दिष्ट असल्याचेही आयुक्त म्हणाले.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर प्रास्ताविकात म्हणाले, “यापूर्वी देखील जागतिक महिला दिनानिमित्त मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी लाखो रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्यात आला. आता दीड कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात येणार आहे. मूळ मालकांना पोलिसांकडून ही एक प्रकारे भेट असेल. सिटीझन सेन्ट्रीक पोलिसिंग कशी असावी याचे उदाहरण यानिमित्ताने शहर पोलीस निर्माण करत आहेत. यापुढे देखील आम्ही तत्परतेने काम करून गुन्हेगारांना अद्दल घडवून फिर्यादी नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. जगाचा डिटेक्शन रेट 32 टक्के आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांचा डिटेक्शन रेट 30 टक्क्यांहून अधिक आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

फिर्यादी प्रतिनिधी म्हणून सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. 2017 साली माझे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ते आता परत दिले असल्याचे चव्हाण म्हणाले.

गोकुलदास भोरा म्हणाले, “2016 साली भाऊ गावी गेला आणि त्याच्या घरात चोरी केली. सुरुवातीला काहीच तपास नव्हता नंतर पोलिसांनी तपास करून चोराला पकडले. यात पोलिसांनी खूप चांगले प्रयत्न केले.”

गायत्री ढवळे म्हणाल्या, “माझ्या बहिणीचा ट्रक चोरीला गेला होता. पोलिसांनी पंजाब मधून हा ट्रक आणला. ट्रक मिळणं कठीण होतं, पण पोलिसांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्रक आणला. पोलीस एवढं सहकार्य करतात हे माझ्यासाठी अनबिलिव्हेबल होतं. पोलीस सहकार्य करत नाहीत, असा लोकांचा समज आहे. पण तो चुकीचा आहे. पोलीस घरातल्या व्यक्तिप्रमाणे मदत करतात. पोलिसांमुळे आमची रोजीरोटी पुन्हा चालू झाली. याबद्दल पोलिसांचे आभार.”

कृष्णा वैद्य म्हणाले, “सहा महिन्यांपूर्वी घेतलेली गाडी चोरीला गेली. वडिलांसाठी ही गाडी घेतली होती. दरम्यान वडील वारले. पोलिसांनी माझी बुलेट मला परत मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांचे आभार.

वसंत कोल्हे म्हणाले, “म्हाळुंगे परिसरातील एका कंपनीत गुन्हा घडला होता. त्यातील मुद्देमाल एक लाखापेक्षा कमी होता. पण पोलिसांनी त्याचा छडा लावून आमचा मुद्देमाल आम्हाला परत मिळवून दिला. पोलिसांनी केलेले काम खरोखर वाखाणण्यासारखे आहे.

मुद्देमाल कारकूनांसाठी पोलीस आयुक्तांकडून पुरस्काराची घोषणा
पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल सांभाळणे ही मुद्देमाल कारकून यांची महत्त्वाची जबाबदारी असते. शुक्रवारी वाटप करण्यात आलेला मुद्देमाल पोलीस दप्तरी जपून ठेवण्यात या कर्मचाऱ्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. चांगले काम करणाऱ्या मुद्देमाल कारकून यांच्यासाठी प्रत्येकी 10 हजारांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.