Chinchwad News : सेवा विकास बँकेच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणात 429 कोटी रुपयांचा गैरव्यवहार – पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज – दि सेवा विकास को ऑप बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ आणि बँक अधिका-यांनी केलेल्या बोगस कर्ज वाटपामध्ये तब्बल 429.57 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. सहकार विभागाने केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला असून त्यानुसार दि सेवा विकास को-ऑप. बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि कर्जदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारी संस्थेकडून दि सेवा विकास को ऑप बँकेचे लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात बँकेची 50 लाख रुपये रकमेपेक्षा अधिक रकमेची 204 कर्ज प्रकरणे तपासण्यात आली. त्यातील 124 कर्ज प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. 124 कर्ज प्रकरणांबाबत कर्ज मंजुरीपूर्व व पश्चात एकूण 429.57 कोटी रुपयांचा गैरव्यवहार, अपहार, फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. या लेखपरिक्षणाचा अहवाल 6 ऑगस्ट रोजी सादर करण्यात आला.

या अहवालामध्ये दि सेवा विकास को. ऑपरेटिव्ह बँकेत विविध कर्ज प्रकरणामध्ये आर्थिक अनियमीतता, गैरव्यवहार, अपहार अफरातफर, फसवणूक व लबाडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदर गैरव्यवहारास जबाबदार असणा-या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सहकार आयुक्तांनी आदेश दिले.

कर्जदार समुहाने मंजूर केलेल्या कर्जप्रकरणातील 472.13 कोटी रुपयांच्या रोख रक्कमा वेळोवेळी काढलेल्या आहेत. त्यातील 43.34 कोटी रुपये रोख स्वरुपात भरणा केले आहेत. असा एकूण 515.47 कोटी रुपये रोख रक्कमांचा आर्थिक व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

कर्जदारांची पतपात्रता नसताना, कर्ज परतफेड क्षमता नसताना, विक्री योग्य व निर्वेध तारण नसताना आणि तारण मूल्यांकन कमी असताना गैरप्रकाराने नियमबाह्य कर्ज मंजूर केले. मंजूर झालेल्या कर्जातून समूहाची जुनी कर्ज बाकी नियमित करणे व कर्जाची परतफेड न करणे, यावरुन वितरीत कर्ज रकमेचे चक्रवहन व गैरविनीयोग (Siphoning Diversion, Misutiliastion ) तसेच कर्जदाराशी विशेष अनुकूलता ठेऊन कर्जवाटप केले. दि सेवा विकास को-ऑप. बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी स्वताच्या आर्थिक फायदयाकरीता कर्ज मंजुर करताना वरील बाबींकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे.

दि सेवा विकास को. ऑप बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, बँक अधिकारी व कर्जदार समुहनिहाय यांच्यावर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर आता नव्याने पिंपरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरीत प्रकरणांमध्ये आणखी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) राजेश उद्धवराव जाधवर (वय 50) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खालील व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेअरमन अमर साधुराम मूलचंदानी,
संचालक मंडळ आरोपी – मनोहर साधुराम मूलचंदानी, डॉ. गुरुबक्ष मतनानी, विजयकुमार गोपीचंद रामचंदानी, नरेंद्र पांडुरंग ब्राह्मणकर, पंकज प्रकाश मसंद, धीरज साधु भोजवानी, भारती प्रकाश नंद, दया अशोक मूलचंदानी, दीपा जीवन मंगतानी, राजेश पोपट सावंत, चंद्रशेखर अहिरराव, अशोक साधुराम मूलचंदानी, प्रकाश शिवनदास पमनानी व इतर

बँकेचे अधिकारी आरोपी
मुख्य कार्यकारी अधिकारी टी एन लखानी, मुख्य कार्यकारी अधिकारी ए एम बासी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच टी मुलानी (मयत), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल शर्मा, सहमुख्य कार्यकारी अधिकारी आर के हिंदुजा, सहाय्यक व्यवस्थापक तथा कर्ज विभाग प्रमुख विजय चांदवानी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भगवानी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी सीमा सूर्यवंशी, उपव्यवस्थापक तथा कर्ज विभाग प्रमुख विजय चांदवानी, सहाय्यक व्यवस्थापक कर्ज विभाग प्रमुख निलम सोनवाणी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पी. जगवानी  व इतर

कर्जदार आरोपी – सागर सुर्यवंशी, शितल सुर्यवंशी (तेजवाणी) समुह, विनय आ-हाना, विवेक आ-हाना व दिप्ती आ-हाना, रोझरी ग्लोबल एज्यकेशन संस्था, धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर व सोनकर समुह, इतर 37 कर्जदार समुह व वैयक्तीक कर्जदार,

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कटटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांचा सहभाग आहे. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.