Chinchwad news: शिवसैनिकांनो, भाजपधार्जिण्या प्रशासनाला बेजार करा : रवींद्र मिर्लेकर

एमपीसी न्यूज – शिवसेनेचा जन्म लढ्यातून झाला आहे. शिवसेनेला प्रशासन चळाचळा कापायचे. आता आपण सत्तेत आहोत, तरी अजूनही अनेक ठिकाणी प्रशासनाला वाटते की हे औटघटकेचे राजे आहेत. मात्र,कुणी असे समजत असेल तर असे समजणाऱ्या भाजपधार्जिण्या प्रशासनाला तुम्ही बेजार करून सोडा, असे आवाहन शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर शिवसैनिकांना केले. तसेच गटबाजीमुळे आपले वाटोळे झाले आहे. त्यामुळे गटबाजी विसरून काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत शहरात मेळावे घेतले जात आहेत. मिशन ‘2022’ अंतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा आज (शनिवारी) शाहुनगर येथे मेळावा झाला. त्यावेळी मिर्लेकर बोलत होते.

शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव, संपर्कप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख योगेश बाबर, सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, शिवसेना महिला आघाडीच्या शिरूरच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे आदी यावेळी उपस्थित होते.

गटबाजीने शहर शिवसेना लयाला गेली आहे. शिवसेनेचे वाटोळे झाले आहे, शिवसेना संपली आहे, असा संताप व्यक्त करत शिवसैनिकांचा फक्त एकच गट तो म्हणजे बाळासाहेबांचा, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा गट होय. नेतृत्वाशी आपली बांधीलकी असली पाहिजे, असे सांगत मिर्लेकर म्हणाले, गटबाजीमुळे आपले उमेदवार पडले. ज्या भागातून सर्वाधिक मताधिक्य शिवसेनेच्या उमेदवाराला मिळायचे तेथे मताधिक्य एकदम कमी झाले. हे सर्व गटबाजीचे परिणाम आहेत. पदाबरोबर कर्तव्य, जबाबदाऱ्या येतात, त्या पूर्ण कराव्यात. शिवसेना त्यागातून उभी राहिलेली संघटना आहे. आता केवळ लढायचे नाही तर जिंकायचे आहे. शिवसैनिकांनी जनतेचा आधारवड व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

फलकावर शहरप्रमुखाचा फोटो नाही !

मेळाव्याच्या फलकावर शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांचा फोटो नव्हता. त्यावरून मिर्लेकर यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना मेळाव्याच्या फलकावर शहरप्रमुखाचा फोटो नाही, असे का व्हावे. यातुनच गटबाजी दिसून येते. येत्या महापालिका निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर हे चित्र बदलायला हवे. सर्वांनी एकदिलाने काम करायला हवे. गटबाजी, मतभेद मोडीत काढा, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.