Chinchwad News : शिवसैनिकांनो…! महानगरपालिका निवडणुकीतील सत्ताबदलाचे शिलेदार व्हा – खासदार श्रीरंग बारणे

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे 'मिशन 2022'अभियान; प्रभागनिहाय बैठकांचा शिवसेनेकडून सपाटा सुरु

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ताबदल हा अटळ आहे. शिवसेनेच्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराला पक्षाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. मात्र उमेदवारांनी घरोघरी जाऊन, जनहिताची कामे करून शिवसेनेचा धनुष्यबाण प्रत्येक शहरवासियाच्या मनामनात रुजवावा. आपला उमेदवार म्हणजे ‘धनुष्यबाण’ अशा पद्धतीचे काम करून महानगरपालिका निवडणुकीतील सत्ताबदलाचे शिलेदार व्हा, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांना दिला.

आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ‘महापालिका निवडणूक मिशन 2022’ हे अभियान सुरु झाले आहे. या अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभागनिहाय बैठका सुरु झाल्या आहेत. महानगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची. मतदार नोंदणी अभियान, शिवसेना सभासद नोंदणी याबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे बोलत होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, सरिता साने, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख व अंगीकृत संघटनांचे शिवसैनिक उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, “राज्यातील विद्यमान ठाकरे सरकारने जनहिताचेच निर्णय घेतले आहेत. ते निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम गटप्रमुख, शाखाप्रमुख यांनी करावे. महानगरपालिकेतील अनागोंदी कारभार आणि चुकीची कामे लक्षात घेता आगामी निवडणुकीत सत्ताबदल अटळ आहे. आता प्रत्येक प्रभागात आपला शिवसैनिक सक्षम झाला पाहिजे. त्या शिवसैनिकामार्फत प्रभागातील कामे झाली पाहिजेत. यासाठी पदाधिकारी वर्गाने नियोजन करावे. महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक इच्छुक उमेदवाराला आवश्यक ती मदत केली जाईल. आपला उमेदवार ‘धनुष्यबाण’ या पद्धतीने घरोघरी पोहोचून आगामी काळातील सत्ताबदलाचे शिलेदार व्हा, असेही खासदार बारणे म्हणाले.

शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारा शाखाप्रमुख, गटप्रमुख कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले. प्रभागातील नागरिकांच्या हिताचे प्रश्न, अडचणी, तक्रारी घरोघरी जाऊन, समजून घ्याव्यात. महापालिका, प्राधिकरण अथवा राज्य शासनांतर्गत विभागाकडील कामे पक्षाच्या कार्यालयात पाठवावीत. ती मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देखील जिल्हाप्रमुख चिंचवडे यांनी दिले.

शहरप्रमुख योगेश बाबर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना शेतकरी आंदोलन, कामगारविषयक कामे, सोशल मीडियावर होणाऱ्या चुकीच्या पोस्ट याबाबत शिवसैनिकांनी जागृत राहून वेळीच योग्य ते उत्तर द्यायला हवे, अशा सूचना केल्या.

शहरसंघटिका उर्मिला काळभोर म्हणाल्या, “महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी आतापासून पक्षाच्या माध्यमातून उपक्रम राबवावेत आणि कामाला सुरुवात करावी.

उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी वाल्हेकरवाडी प्रभागाची एकूण भौगोलिक रचना सांगितली. तसेच महापालिकेची सुरु असलेली अर्धवट कामे, शास्ती कराचा प्रश्न, ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्राचा प्रश्न यामध्ये पक्षाने लक्ष घालण्याची सूचना केली.तसेच अनिता तुतारे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.