Chinchwad News: ‘सीसीसी’ सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलला वेतनापोटी 70 लाख दिले

एमपीसी न्यूज – चिंचवड ऑटो क्लस्टर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कोरोना केअर सेंटर चालविणा-या स्पर्श हॉस्पिटलला पाच महिन्यापोटी कर्मचा-यांच्या वेतनावर झालेला 70 लाख रूपये खर्च देण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारण्यात आले. काही कोरोना केअर सेंटर खासगी रूग्णालय, एनजीओ किंवा खासगी संस्था यांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला.

चिंचवड – ऑटो क्लस्टर येथील कोरोना केअर सेंटर स्पर्श हॉस्पिटलला चालविण्यास देण्यात आले आहे. येथील कॉर्डीओलॉजीस्ट, नेफ्रोलॉजिस्ट अशा तज्ञ डॉक्टरांना प्रति महिना 1 लाख 25 हजार रूपये मानधन देण्यात येत आहे.

मात्र, हे मानधन कमी असून त्यांना अनुक्रमे 3 लाख 50 हजार रूपये आणि 4 लाख 50 हजार रूपये मानधन मान्य करावे, अशी विनंती स्पर्श हॉस्पिटलने केली होती. मात्र, महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी 1 लाख 25 हजार रूपये इतकेच मानधन तज्ञ वैद्यकीय अधिका-यांना देण्यात येईल, असे शेरांकन केले आहे.

स्पर्श हॉस्पिटल मार्फत 28 ऑगस्ट 2020 पासून ऑटो क्लस्टर येथील कोरोना केअर सेंटर चालविले जात आहे. अतिरिक्त कर्मचारी आणि सुपर कन्सल्टंट यांची मान्यता मिळाल्यावर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यापासून त्यांना कामावर रूजू केले असून त्यांचे हजेरीपत्रक आणि बील सादर केले आहे.

त्यामध्ये सीएसएसडी – 3, फार्मासिस्ट – 2, स्टोअर – 1, ओ 2 बँक – 2, फिजिओथेरपिस्ट – 1, हदयरोग तज्ञ – 1, किडनीतज्ञ – 1, प्रसुतीतज्ञ – 1, मानसोपचार तज्ञ – 1 आणि 15 सुरक्षारक्षक असे मनुष्यबळ आहे.

स्पर्श हॉस्पिटल यांनी अतिरिक्त मनुष्यबळाच्या बिलामधील अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांच्या उपस्थितीचा अहवाल सादर केला आहे. महापालिकेने मान्य केलेल्या 13 लाख 20 हजार रूपये बिलाची लवकरात लवकर पूर्तता करावी, अशी विनंती स्पर्श हॉस्पिटलने 14 जानेवारी 2021 रोजीच्या पत्राद्वारे केली आहे.

त्यानुसार, 18 सप्टेंबर 2020 ते 27 फेब्रुवारी 2021 या पाच महिने कालावधीतील 70 लाख 76 हजार रूपये स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.