Chinchwad News: ‘चिंचवड गावठाणात जेष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्र सुरू करा’

नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांची मागणी

एमपीसी न्यूज – चिंचवड गावठाण येथे जेष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्र सुरू करा, अशी मागणी भाजप नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना शेडगे यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात नमुद केले आहे की, कोविड 19 चे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेने लसीकरण सुरू केले आहे. सध्या महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात जेष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्र सुरू आहे.

चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 17, 18 व 19 मध्ये सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्यामुळे तालेरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जेष्ठांना तासनतास रांगेत थांबावे लागत आहे. अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदींसह विविध आजार आहेत. त्यांचे हाल होत आहे.

जेष्ठ नागरिकांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून त्यांच्यासाठी चिंचवड गावठाण येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक शेडगे यांनी निवेदनात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.