Chinchwad News : पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध – अजित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला अनेक अडचणी आहेत. त्यातूनच पोलीस चांगले काम करत आहेत. अपुरी संसाधने असताना त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. पुढील काळात पोलीस दलाचे बळकटीकरण केले जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्ट्स सायकल वाटपाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला पोलीस वाहने, मनुष्यबळ, परेड ग्राउंड, निवासस्थाने, आयुक्तालय इमारत, पोलीस ठाण्यांच्या इमारती चांगल्या नाहीत अशा अनेक अडचणी आहेत. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहेत. आयुक्तालयाला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या जमिनी देण्यासाठी बैठकी घेतल्या आहेत. आता निधी दिला आहेच, यापुढील काळात आवश्यकता भासल्यास आणखी निधी देण्यात येईल. बावधन चौकी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला जोडण्यात येणार आहे. तर रावेत, शिरगाव आणि म्हाळुंगे पोलीस चौक्यांना पोलीस ठाणे म्हणून मंजुरी दिली आहे.

2021 हे वर्ष कोरोनमुक्तीचे असेल
स्मार्ट वॉच वाटपाचा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांची कार्यक्षमता वाढविणारा आहे. 2020 हे वर्ष कोरोनासाठी लढण्यात गेलं. 2021 हे वर्ष कोरोनमुक्तीचे असेल, अशी प्रार्थना करूयात. स्मार्ट वॉचच्या माध्यमातून पोलिसांचे आरोग्य चांगले राहील. यामुळे पोलीस स्मार्ट होण्यास मदत होईल. उद्यापासून पोलीस स्मार्ट वॉच घालून कर्तव्यवर येतील. हे वॉच पोलिसांच्या आरोग्याबाबत निरीक्षण करेल.

2018 मध्ये नोटबंदी झाली. आपल्याकडे मोठा दुर्गम भाग आहे. अनेक अडचणी येतील, म्हणून त्यासाठी आम्ही विरोध केला. दरम्यान एक अफवा उठली की दोन हजार रुपयांच्या नोटमध्ये चिप बसवली असून नोटा लपवल्यास सरकारला कळणार. त्याबद्दल खरं काय मला माहिती नाही. पण स्मार्ट वॉच खरोखर स्मार्ट आहे. या वॉचच्या माध्यमातून पोलिसांचे लोकेशन वरिष्ठांना समजणार आहे. पोलिसांच्या फिटनेस आणि ड्युटीची माहिती कळण्यास मदत होणार आहे. स्मार्ट वॉच खऱ्या अर्थाने पोलिसांचे जीवन स्मार्ट करणार आहे. अशाच प्रकारचा स्मार्ट वॉच गुन्हेगारांवर ठेवावा.

पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेला तोड नाही
पोलिसांनी कोरोना काळात जोखीम पत्करून पार पाडलेली जबाबदारी आणि कर्त्यव्यनिष्ठेला तोड नाही. पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करतो. कोरोनाशी लढताना काही पोलिसांचा मृत्यू झाला. त्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण करतो. लोकांनी देखील पोलिसांसाठी आपलेपणाचे वातावरण निर्माण केले होते.

महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट आयुक्तालयाची इमारत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची असेल. पोलिसांसाठी हक्काचे घर असण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गुन्हेगारीतून मिळणाऱ्या पैशातून प्रस्थ वाढविण्याचे काम काहींनी सुरु केलंय. हे मोडून काढण्यासाठी मी स्वतः लक्ष घातलंय.

पोलिसांना पाहून चोरांनी पाळायला हवं
चोर आले म्हणून पोलीस पळाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली. यामुळे समाजात पोलिसांची प्रतिमा खराब होते. तसेच चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या मनोबलावर देखील परिणाम होतो. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हातात फक्त काठी असताना शहिद पोलीस तुकाराम ओंबाळे यांनी कसाबला जिवंत पकडले. त्यात ते शाहिद झाले. असा शौर्याचा वारसा आपल्या पोलीस दलाला आहे. पोलिसांचा वचक सामान्य नागरिकांवर नाही तर गुन्हेगारांवर असला पाहिजे. नागरिक पोलिसांकडे विश्वासाने यायला हवे अन समाधानाने जायला हवे.

पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अनेक दानशूर वक्ती आहेत. सीएसआर निधी, आमदार निधी, जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निधीची मदत घेऊन पोलीस दलाला बळकटी द्यावी. पुढील काळात राज्यात मोठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 सालच्या पोलीस भरतीमध्ये एसईबीसी मधून अर्ज केला होता. त्यांना दिलासा देण्यासाठी पूर्वीचा जीआर रद्द करण्यात आला आहे. नवीन जीआर लवकरच काढण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.