Chinchwad news: लहुजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यामागील होर्डिंगचे काम तातडीने थांबवा

नगरसेविका अनुराधा गोरखे यांची मागणी

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन येथील लहुजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यामागील होर्डिंगचे काम तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका गोरखे यांनी म्हटले आहे की, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तथा क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा महाराष्ट्रातील सर्वात जुना ऐतिहासिक अर्धपुतळा चिंचवड स्टेशन येथे 16 मे 1985 रोजी स्थापित करण्यात आला आहे.

त्यांच्या स्मृती सदैव मनात राहाव्यात, या उद्देशाने हे स्मृतिस्थळ महापालिकेने उभे केले आहे. हे दोन्ही क्रांतीवीर समाजाची प्रेरणा आहेत. या स्थळाच्या सुशोभीकरणासाठी माझ्या पाठपुराव्याने 38 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याची निविदाही काढली आहे.

या स्मृती स्थळांच्या पाठीमागे आकाश चिन्ह परवाना विभागाद्वारे मोठ्या लोखंडी होर्डिंगचे काम चालू आहे. त्याचा पुतळ्यांच्या नवीन सुशोभीकरणाला अडथळा निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे हे काम त्वरीत थांबवावे. या दोन्ही क्रांतिकारांवर समाजाची निष्ठा असल्याने हे काम थांबले नाही तर समाजाच्या भावनेचा उद्रेक होऊ शकतो, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.