Chinchwad News : डेंग्यू आणि कोरोनाचा एकत्रित व दुर्मीळ संसर्ग झालेल्या 10 वर्षीय मुलीवर बिर्ला रुग्णालयात यशस्वी उपचार

सध्या तपासणी अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आजवर लहान मुलांमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे डेंग्यू आणि कोविड असा एकत्रित संसर्ग आढळून आला.

एमपीसी न्यूज – लहान मुलांमध्ये दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या बालरुग्ण डेंग्यू आणि कोविड-19 ची एकत्रित लागण झालेल्या 10 वर्षीय मुलीवर आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले.

डेंग्यू आणि कोविड-19 ची एकत्रित लागण झालेल्या 10 वर्षीय मुलीला ‘आदित्य बिर्ला’च्या फ्लू क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तिची तपासणी केली असता तिचा टॅकीकार्डीया (दर मिनिटाला एखाद्याचे हृदय 100 पेक्षा अधिक वेळा धडधडणे) समवेत 103 फॅरनहाईट याप्रमाणे तापमान असल्याचे स्पष्ट झाले.

तिला श्वसनाची कोणत्याही प्रकारची अडचण जाणवत नव्हती तसेच, ऑक्सिजन सॅच्युरेशन (spO2) खोलीतील हवेत 98% याप्रमाणे आढळले. मुलीचे वजन हे अपेक्षित वजनाच्या तुलनेत अधिक (बीएमआय – 25.6) असल्याने व्याधीग्रस्त (कोमॉर्बिड) अवस्थेत मोडत होती.

तिला ल्युकोपोनियाची तक्रार असल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले. या प्रकारात रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण सातत्याने कमी होते. त्याचप्रमाणे छातीच्या एक्स-रेमध्ये बायलॅटरेट इनफिलट्रेट आढळले. लहान मुलीला त्वरीत आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.

मुलीवर त्वरीत उपचार सुरू झाले. तिच्या लॅब टेस्ट आणि प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. त्यात ल्युकोपोनिया समवेत प्लेटलेट सामान्य होते. लिव्हर एन्झाइमची स्थिती वाईट होती. दाहजन्य परिस्थितीत वाढ झाली होती. तिला औषधोपचार देण्यात आले आणि छातीचा एचआरसीटी करण्यात आला.

हॉस्पिटलला दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला दोन्ही फुप्फुसांवर एरीथमेटोस मॅक्यूलोपप्यूलर रॅश (त्वचेवर विचित्र लाली) आढळली ते व्रण वाढत होते. हात-पाय-चेहरा वगळता इतरत्र बाह्यांगावरही दिसत होते. पुन्हा करण्यात आलेल्या तपासणीत प्लेटलेट सोबतच पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होत असल्याचे निदर्शनास आले.

‘आम्ही NS1 आणि अँटी- IgM डेंग्यू चाचणी केली. ती पॉझिटीव्ह आली’ असे, असोसिएट कन्सलटंट निओनाटोलॉजिस्ट आणि पेडीयाट्रिशन डॉ. वृषाली बिचकर यांनी सांगितले.

सध्या तपासणी अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आजवर लहान मुलांमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे डेंग्यू आणि कोविड असा एकत्रित संसर्ग आढळून आला.

कोविड 19 चे संक्रमण बळावत असताना आणि डेंग्यूच्या केसमध्येही वाढ होत असताना अशाप्रकारे एकत्रित संक्रमणाकडे बालरोगतज्ज्ञ आणि डॉक्टरांनी लक्ष ठेवावे असे सूचित करण्यात येते, असे निओनाटोलॉजिस्ट आणि पेडीयाट्रिशन डिपार्टमेंटचे असोसिएट डायरेक्टर डॉ. राहुल काल्लीआनपूर यांनी पुढे माहिती देताना सांगितले.

मुलीला डेंग्यू आणि कोविड 19 चा संसर्ग झाला असल्याने त्यानुसार उपचार सुरू झाले. तिला इतरही व्याधींची पार्श्वभूमी असल्याने ते लक्षात घेऊन औषधे सुरू करण्यात आली.

बालिकेच्या शरीराचे तापमान, रक्तदाब, तिला देण्यात येणारा आहार, तिच्या शरीरातील पाण्याची पातळी याकडे काटेकोर लक्ष ठेवण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यापासून 3 दिवसांत तापाने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.

शरीराचे तापमान उतरले. आहाराचे प्रमाण वाढले. रुग्णालयात दाखल झाल्यापासून 5 दिवसांत लालसरपणा पूर्णपणे निघून गेला. तिच्या डावीकडील वेन्ट्रिक्यूलर हायपोकिनेशियावर सौम्य प्रभाव होता (डिस्टल ॲनटेरिअर वॉलवरील आकुंचन कमी झाले). ही स्थिती इको रिपोर्टमध्ये आढळली.

इजेक्शन फ्रॅक्च्शन 45-50%असून कालांतराने त्यात सुधारणा आढळून आली. ईकेजी (हृदयाच्या इलेक्ट्रीकल सिग्नलचे डिजीटल रेकॉर्डिंग) सामान्य झाले. तपासणी अहवालात पांढऱ्या पेशी, प्लेटलेट, लिव्हर एन्झाइम काउंट सुधारल्याचे निदर्शनास आले.

उपचारानंतर करण्यात आलेली चाचणी निगेटिव्ह आली तर, डेंग्यू संसर्ग सामान्य झाल्याचं दिसून आले. मुलीच्या तब्येतीत सुधारणा दिसल्यानंतर तिला काही औषधे लिहून दिली आणि घरी सोडण्यात आले.

‘माझ्या लेकीचा जीव वाचविल्याबद्दल आम्ही आदित्य बिर्ला हॉस्पिटलचा वैद्यकीय कर्मचारी वर्ग आणि डॉक्टरांचे आभार मानतो. आमचे पूर्ण कुटुंब कोविड पॉझिटीव्ह होते, ताप उतरत नव्हता. त्यामुळे आम्ही प्रचंड घाबरलो होतो. मुलीला डेंग्यूचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आल्याने आम्ही चिंतेत होतो. आमच्या कठीण परिस्थितीत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आम्हाला चांगली साथ दिली आणि आमची मुलगी बरी झाली’, अशी प्रतिक्रिया मुलीच्या वडिलांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.