Chinchwad News : रेशनिंगच्या गहू, तांदूळ वाटपात घोटाळा करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा – भापकर  

एमपीसी न्यूज – शासनाकडून गोरगरिबांसाठी येणा-या रेशनिंग गहू, तांदूळ वाटपात घोटाळा केला जात असल्याचा आरोप करत घोटाळा करणा-दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत निगडी विभाग परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मोहननगर, महात्मा फुलेनगर, इंदिरानगर, काळभोरनगर, रामनगर, चिंचवडस्टेशन, आनंदनगर, विद्यानगर, दत्तनगर आदी परिसरात रेशनकार्ड धारक लाभार्थीसाठी अंतोदय, अन्न सुरक्षा योजने अंतर्गत शासनाकडून येणाऱ्या धान्य कोटयामध्ये काळाबाजार होत आहे. यावर तातडीने योग्य उपाय योजना राबवाव्यात अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.

शासनाकडून अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 100 टक्के कोटा येतो. रेशनकार्ड मधील पात्र नावाप्रमाणे प्रति महिना प्रतिव्यक्ती 2 रुपये किलोप्रमाणे 3 किलो गहू व मोफत 3 किलो तांदूळ एकूण 6 किलो धान्य प्रतिव्यक्ती लाभार्थींना मिळायला हवे. तसेच प्रतिव्यक्ती 3 रुपये याप्रमाणे 2 किलो तांदूळ व 2 किलो मोफत तांदूळ असे एकूण 4 किलो तांदूळ मिळायला हवा.

मात्र, वरील परिसरातील काही व्यापारी यातील निम्म्या मालाचा काळाबाजार करून गोरगरीब नागरिकांना फसवतात. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन संबंधित सर्व दुकानदारांची चौकशी करावी. लाभार्थींचा जबाब घेऊन यातील दोषी व्यावसायीकांवर कठोर कारवाई करावी. तक्रारींची गंभीरपणे दखल घेतली नाही. तर, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.