Chinchwad News : ‘अभाविप’ची दहा वर्षे जीवनातील सुवर्णकाळ होता – प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य असताना विविध आंदोलने, सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला. याच काळात मला माझी ओळख होत गेली. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा मी स्वत: सोबतच स्पर्धा करत राहिलो आणि चुकांमधून शिकत राहिलो. ‘अभाविप’ची दहा वर्षे माझ्या जीवनातील सुवर्णकाळ होता, असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज (रविवारी, दि. 7) चिंचवड येथे व्यक्त केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 55 वे अधिवेशन आज चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, ‘अभाविप’चे राष्ट्रीय अध्यक्ष छगनभाई पटेल, महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सारंग जोशी, महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे, स्वागत समिती अध्यक्ष सुधीर मेहता, स्वीकृत नगरेसेवक मोरेश्वर शेडगे, पिंपरी चिंचवड महानगर अध्यक्ष शिल्पा जोशी, पिंपरी चिंचवड महानगर मंत्री प्रथमेश रत्नपारखी व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले की, कामाचा आनंद मिळावा म्हणून आपण काम करावे, ही शिकवण मला  ‘अभाविप’ने दिली. युवकांनी नेहमीच बंडखोर असावे. विद्यार्थी दशेत अनेक सत्याग्रह आणि आंदोलनांत आम्ही सहभागी झालो. परिषदेने अनेकांच्या विचारांना चालना दिली, असे जावडेकर म्हणाले.

जयप्रकाश नारायण यांचे भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन सुरू होते, त्यावेळी आम्ही त्यात सहभागी झालो. देशात आणबाणी लादण्यात आली. त्यावेळी देखील सत्याग्रह केले. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला. सत्याग्रह केल्याने जेलमध्ये जाण्याची भीती होती. तरीही सत्याग्रहात सहभागी व्हायचे या जिद्दीने यात सहभागी झालो. या काळात 16 महिने जेलमध्ये सुद्धा होतो, असे जावडेकर यांनी नमूद केले.

जावडेकर म्हणाले की, भाजप सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. पिक विमा, किसान सन्मान निधीच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ भेटल्याचे त्यांनी सांगितले. गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारवर टीका देखील करावी, सरकारला सल्ले द्यावेत त्याचे स्वागतच आहे. पण, मीडियाने देखील त्यांची जबाबदारी ओळखून सत्याची बाजू लावून धरली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. देश बदलत आहे. पुढे जात आहे आणि आणखी पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे गिरीश प्रभुणे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये अभाविप’च्या आठवणींना उजाळा दिला. गुरूकुल संस्था सुरू करण्याचा उद्देश आणि त्यासाठी मदत लाभलेल्या निष्ठावंताचे त्यांनी आभार मानले. झोपडपट्टी भागापर्यंत विकास पोहचणे हा खरा आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा आत्मा असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रकाश जावडेकर आणि आम्ही एकत्र काम केलं आहे. ते आज केंद्रात मंत्री आहेत. त्याठिकाणी ते उत्कृष्ठ काम करत आहेत. समाजातील सर्वांनाच समान न्याय मिळावा, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

अभाविप’चे राष्ट्रीय अध्यक्ष छगनभाई पटेल यांनी, अभाविप’च्या देशस्तरावरील कार्याचा आढावा घेतला. परिषद समाजातील विविध समस्यांवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. परिषदेच्या माध्यमातून चांगला विद्यार्थी, चांगला सेवक आणि चांगली व्यक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न निरंतर करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिवेशनाचे स्वागत भाषण सुधीर मेहता यांनी केले. अधिवेशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी तर, आभार प्रदर्शन पिंपरी चिंचवड महानगर अध्यक्ष शिल्पा जोशी यांनी केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.