Chinchwad News: बहारदार संतूरवादन आणि सुरेल गायनाने रंगले स्वरसागर महोत्सवाचे पहिले सत्र

एमपीसी न्यूज – प्रेक्षागृहाबाहेर जोरदार बरसणारा अवकाळी पाऊस आणि त्यातच मनात रुंजी घालणारे संतूरचे रुणझुणणारे सूर असा वेगळाच माहौल स्वरसागर महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रसिकांनी अनुभवला.

पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित चोविसावा स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव शुक्रवारी(११ मार्च) सुरु झाला. यंदा महोत्सव तीन दिवस रंगणार आहे. उद्घाटन व पुरस्कार वितरणाच्या सत्रानंतर पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र व शिष्य राहुल शर्मा यांचे बहारदार संतूरवादन झाले. बाहेर पडणा-या पावसाच्या साथीने राहुलजींनी सायंकाळी वाजवला जाणारा राग रागेश्री लीलया खुलवला. त्यांची संतूरवर नजाकतीने फिरणारी कलम रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेली. सुरुवातीला त्यांनी आलाप, जोड, झाला सादर केले. त्यानंतर रागेश्रीमधील वेगवेगळ्या तालातील तीन रचना सादर केल्या. पहिल्या रचनेत नऊ मात्रा आणि मध्य ताल होता. दुसरी रचना मध्य तालातील व तिसरी रचना द्रुत तीन तालातील होती. त्यांची संतूरवरील हुकुमत त्यांच्या वादनातून समर्थपणे दिसत होती. राहुलजींना तितकीच समर्थ तबला साथ आदित्य कल्याणपूरकर यांनी केली. यावेळी विशेषत्वाने उपस्थित असणारे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या संतूरवादनाचा आनंद घेतला.

संतूरवादनानंतर यंदाचा पं. पद्माकर कुलकर्णी युवा पुरस्कार विजेती शाश्वती चव्हाण हिचे शास्त्रीय गायन झाले. पं. सुधाकर चव्हाण यांची कन्या व शिष्या शाश्वती हिने यावेळी राग बिहाग सादर केला. कैसे सुख सोवे जाऊ ही विलंबित बंदिश त्यातील वैशिष्ट्यपूर्ण सरगमसह शाश्वती हिने जोरकस पद्धतीने सादर केली. त्यानंतर तिने आली रे अलबेली सुंदर नार ही तीन तालातील द्रुत लयीतील रचना सादर केली. शाश्वती हिने आपल्या गायनाचा समारोप विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या संत तुकारामांच्या अभंगाने केला. अत्यंत सुरेल आणि उत्तम फिरत असलेले या युवा गायिकेचे गाणे तिचा गाण्याविषयीचा विचार दाखवणारे होते. तिला संवादिनीची साथ गंगाधर शिंदे यांनी केली. तसेच तबला साथ रोहित मुजुमदार यांनी केली. तानपु-याची साथ सिद्धी ताजणे व श्रावणी विरोकार यांनी केली.

उद्घाटनाच्या सत्रात छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त तसेच मागील वर्षात दिवंगत झालेल्या मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ गायक पं. जसराज. पं. राजन मिश्रा, भारतरत्न लता मंगेशकर, उस्ताद बिरजूमहाराज आणि ज्येष्ठ उद्योगपती आणि पिंपरी चिंचवडचे रहिवासी राहुल बजाज यांना यावेळी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.