Chinchwad News: ‘अंतरंग’ची दर्जेदार दिवाळी अंकाची परंपरा कायम – प्रवीण बिचे

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूज व ‘अंतरंग’ची दर्जेदार दिवाळी अंकाची चांगली परंपरा आहे. हीच परंपरा यंदाच्या दिवाळी अंकानेही कायम ठेवली आहे, असे उद्गार नामवंत उद्योजक व ऑरबिटल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बिचे यांनी आज (शुक्रवारी) काढले.

एमपीसी न्यूजच्या ‘अंतरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रवीण बिचे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. एमपीसी न्यूजच्या चिंचवड कार्यालयात झालेल्या छोटेखानी अनौपचारिक कार्यक्रमास ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार, सहयोगी संपादक अनिल कातळे, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर अनुप घुंगुर्डे तसेच कार्यालयीन समन्वयक समीर पाटील आदी उपस्थित होते.

एमपीसी न्यूजने पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची ऑनलाईन मीडियाची गरज पूर्ण केली आहे. निर्भिड, निष्पक्ष व विश्वासार्ह पत्रकारिता हे एमपीसी न्यूजचे खास वैशिष्ट्य आहे. पत्रकारांनी सुरू केलेल्या व चालविलेल्या या मीडिया हाऊसचा 12 वर्षांचा प्रवास नेत्रदीपक आहे, असे बिचे म्हणाले. एमपीसी न्यूजच्या सर्व वाचकांना बिचे यांनी दिवाळीच्या व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

यंदाच्या या अंकात कथा, ललितलेख, व्यक्तीपरिचय, पुस्तकपरिचय असा दर्जेदार मजकूर थोड्या कालावधीत वाचकांना देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. तसेच लोकमान्य हॉस्पिटलने सुरु केलेल्या हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी हा डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या उपक्रमावरील विशेष लेख अवश्य वाचावा असा आहे.

आपत्ती की इष्टापत्ती, ऑनलाईन शिक्षणाचा अट्टाहास, दिवंगत संगीतकार खय्याम यांच्यावरील लेख, मराठी भाषेची महती सांगणारा लेख, भारतीय संगीताचा आढावा घेणारा लेख, टीव्हीवरील वेगळा अनुभव, दुर्गअभ्यासक संदीप तापकीर यांच्यावरील लेख या व इतर अनेक वेगळ्या विषयांवरील लेखांचा या अंकात समावेश करण्यात आला आहे.

करोनाच्या संसर्गामुळे यंदाची पंढरीची वारी नेहमी प्रमाणे होऊ शकली नाही. पण मनोमन पांडुरंग जपणा-या सच्च्या वारक-याचे मनोगत या अंकात आहे. तसेच वाचकांच्या विशेष आवडीचे संपूर्ण वर्षाचे राशीभविष्य नक्कीच जाणून घ्यायलाच हवे.

लक्षवेधी मुखपृष्ठाची परंपरा कायम ठेवत यंदा देखील अंतरंगच्या मुखपृष्ठावर चंदा शिंदे या कलावतीची मनमोहक अदा आहे. छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी हे लक्षवेधी छायाचित्र काढलेले आहे.

या छोटेखानी कार्यक्रमाचे विवेक इनामदार यांनी प्रास्ताविक केले तर अनिल कातळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.