Chinchwad News : पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावणा-या चोरट्याला अटक; 23 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या नागरिकांच्या हातातील मोबाईल फोन दुचाकीवरून जाऊन जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या एका चोरट्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 23 मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा 3 लाख 64 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

संजय गजानन मरगुरे (रा. घरकुल, चिखली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. आरोपी संजय याने दुसरा साथीदार अक्षय चव्हाण (रा. घरकुल, चिखली) याच्या सोबत मिळून मोहननगर, जाधववाडी, मोशी, चिखली, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिंचवड, निगडी, रावेत या परिसरात मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेले आहेत.

मागील काही दिवसांमध्ये मोबाईल फोन हिसकावून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. दररोज मोबाईल फोन हिसकावून नेण्याचे गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून हे मोबाईल चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जात आहेत. याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.

युनिट दोनचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मुंढे, अतिश कुडके यांना माहिती मिळाली की, नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावुन चोरीचे गुन्हे करणारा गुन्हेगार संजय मरगुरे हा क्वालिटी सर्कल गवळीमाथा येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संजय याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करत पोलिसांनी तब्बल 23 मोबाईल फोन आणि एक पल्सर दुचाकी असा 3 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी संजय याने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून मोहननगर, जाधववाडी, मोशी, चिखली, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिंचवड, निगडी, रावेत या परिसरात मोबाईल फोन जबरदस्तीने चोरले असल्याची कबुली दिली आहे. आरोपी संजय याला एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक संजय निलपत्रेवार, सहाय्यक फौजदार दिलीप चौधरी, पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी, केराप्पा माने, वसंत खोमणे, उषा दळे, विपूल जाधव, नामदेव कापसे, आतिष कुडके, शिवाजी मुंडे अजित सानप, तांत्रिक विश्लेषक राजेद्र शेटटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.