Chinchwad News: मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांकडून तीन रिक्षा, सहा दुचाकी जप्त

पिंपरी-चिंचवड शहरात रात्रीच्या वेळी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण राखण्यासाठी चिंचवड पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे.

एमपीसी न्यूज – चिंचवड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन रिक्षा आणि सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही मुले मौजमजा करत फिरण्यासाठी वाहन चोरी करत असल्याची कबुली मुलांनी पोलिसांना दिली आहे. या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सहा पोलीस ठाण्यातील सात गुन्हे उघडकीस आले आहेत. तर दोन दुचाकींच्या मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात रात्रीच्या वेळी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण राखण्यासाठी चिंचवड पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. तपास पथकातील पोलीस गस्त घालत असताना रिव्हर व्ह्यू हॉटेलजवळ तीन मुले एकाच दुचाकीवरून येत असल्याचे पोलिसांना दिसले. तिन्ही मुलांचा संशय आल्याने पोलिसांनी तिघांना थांबवून त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली.

मुलांनी पोलिसांना दुचाकीच्या कागदपत्रांबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी तिघांना पोलीस चौकीत आणून कसून चौकशी केली. त्यावेळी ती दुचाकी त्यांनी चिंचवड येथील रांका ज्वेलर्स या दुकानाच्या समोरून चोरी केल्याचे सांगितले.

तसेच त्या मुलांनी मौजमजा करण्यासाठी आणि फिरण्यासाठी खडकी, चतुश्रुंगी, हिंजवडी, वाकड, एमआयडीसी भोसरी आणि चिंचवड येथून दुचाकी आणि रिक्षा चोरी केल्याचे सांगितले.

पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांकडून तीन ऑटो रिक्षा आणि सहा दुचाकी असा एकूण तीन लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्याकडून आणखी वाहने मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील दोन, चिंचवड, हिंजवडी, एमआयडीसी भोसरी, खडकी आणि चतुश्रुंगी या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. एमएच 10 एक्स 5868 आणि एमएच 14 सीझेड 8422 या दोन दुचाकींच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र जाधव, निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, स्वप्नील शेलार, ऋषिकेश पाटील, विजयकुमार आखाडे, नितीन राठोड, पंकज भदाणे, गोविंद डोके, अमोल माने यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.