Chinchwad News : चाकण, भोसरी, तळेगावातून तीन दुचाकी चोरीला

याबाबत चाकण, भोसरी आणि तळेगाव दाभाडे परिसरातून आणखी तीन दुचाकी वाहने चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

एमपीसी न्यूज – वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. चाकण, भोसरी आणि तळेगाव दाभाडे परिसरातून आणखी तीन दुचाकी वाहने चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 25) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

शशिकांत अरुण चोपडे (वय 31, रा. राणूबाई मळा, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चोपडे यांनी त्यांची एक लाख 78 हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड बुलेट 24 ऑगस्ट रोजी रात्री कुरुळी गावात मारुती सुझुकी शोरूम समोरच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्री साडेआठ वाजता अज्ञात चोरट्यांनी त्यांची बुलेट चोरून नेली.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

संतोष श्यामबिहारी शर्मा (वय 42, रा. खंडोबामाळ, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एमएच 06 / वाय 2573) 16 ऑगस्ट रोजी दुपारी भोसरी येथील न्यू श्रद्धा ज्वेलर्स या दुकानाच्या समोर उड्डाणपुलाखाली पार्क करून ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुपारी साडेचार वाजता दुचाकी चोरून नेली.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

जितेंद्र चिलाजी मराठे (वय 34, रा. वराळे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मराठे यांचे भाऊ त्यांची दुचाकी (एमएच 14 / सीबी 0730) घेऊन तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल येथे उपचारासाठी गेले. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये दुचाकीला लॉक करून पार्क केली.

23 ऑगस्ट रोजी दुपारी पाच ते 24 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी चोरून नेली.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.