Chinchwad News : पारंपारिक लावणी जपली जाईल – सुधीर मुनगंटीवार

एमपीसी न्यूज – लावणी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव, वारसा आहे.  लावणी ( Chinchwad News) उत्तम उर्जा देणारी पारंपारिक कला आहे. ही कला जपली जाईल. आमदारांना प्रत्येक जिल्ह्यात लावणी महोत्सव घेण्यास सांगू,  ही पारंपारिक लावणी जपण्यासाठी मोठा लावणी महोत्सव घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

लावणी कला पुनर्जीवित करण्यासाठी, पारंपारिक लावणी जपण्यासाठी आमदार उमा खापरे आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय लावणी महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. बक्षीस वितरणाप्रसंगी मंत्री मुनगंटीवार बोलत होते.  लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे,  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा संपर्कनेते, आमदार सचिन अहिर, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार महादेव जानकर, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले आदी उपस्थित होते.

लावणी स्पर्धेत ‘कैरी पाडाची’ या संघाने प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले. ‘राजसा तुम्हासाठी’, ‘साज’ आणि ‘जल्लोष अप्सरांचा’ यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. सर्वोत्कृष्ट नृत्यांगना म्हणून सोनाली जळगावकर यांचा गौरव केला. ज्येष्ठ नृत्यांगना लीला गांधी, माया जाधव, ज्येष्ठ कथ्थक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, नृत्यांगना संजीवनी मुळे नगरकर व सीमा पोटे नारायणगावकर यांना पुरस्कार देऊन गौरविले.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, मराठी सांस्कृतिक शास्त्रात उत्तम उर्जा देणारा लावणी हा एक प्रकार आहे. लावणी ही मराठी मनाचे वैभव आहे. सांस्कृतिक विभागाचे  राजदूत बनून उमा खापरे आणि सुलभा उबाळे या दोघींनी लावणी महोत्सव घेतला. पोटाची भूक ही पाकपदार्थ, पाकशास्त्राने भागते. त्याचप्रमाणे मनाची भूक आणि मनाचे समाधान हे सांस्कृतिक शास्त्रानेच करायचे असते.

 

Pune News : भारतीय विद्या भवनमध्ये ‘कीर्तन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

सुरेखा पुणेकर यांनी लावणी सातासमुद्रापार नेली. नटरंगीनारचे विदेशात शो झाले. असा कलाकार आमदार झाला. तर, लावणी कलेला राजाश्रय मिळेल. त्यामुळे पुणेकर यांना विधानपरिषदेत पाठवावे, अशी मागणी आमदार जानकर यांनी केली. आमदार सचिन अहिर म्हणाले, लावणीची पंरपरा जपण्यासाठी असे महोत्सव जिल्ह्या-जिल्ह्यात व्हायला पाहिजेत. कुटुंबांसोबत महोत्सव बघता येत आहेत. लावणीचे जतन करण्यासाठी ‘अॅकडमी’ होणे गरजेचे आहे.

अंतिम फेरीत आलेल्या ‘कैरी पाडाची’,  ‘राजसा तुम्हासाठी’, ‘साज’ आणि ‘जल्लोष अप्सरांचा’ या चार संघामध्ये सवाल-जवाब झाला. साज ग्रुपचे शाहीर श्रीकांत रेणके – कवठेकर यांनी पोत्या पुराणांचा आधार घेऊन  दोन सवाल दिले. जल्लोष अप्सरांच्या ग्रुपला दोनही सवालांचे  जवाब देता आले नाहीत. प्रेक्षक सुनंदा पाटील, ममता भिसे  यांनी उत्तर दिले. त्यात साज ग्रुप ( Chinchwad News) विजयी झाला. त्यानंतर मी राजसा तुम्हासाठी आणि  कैरी मी पाडाची या ग्रुपमध्ये जुगलबंदी झाली. मी राजसा तुम्हासाठी ग्रुपने पहिला सवाल दिला. त्याचा जवाब कैरी मी पाडाची ग्रुपला देता आला नाही. महिला प्रेक्षक निशा कदम यांनी उत्तर दिले. कैरी मी पाडाची ग्रुपच्या सवालाचे उत्तर मी राजसा ग्रुपने दिले. नृत्यांमधून हा सवाल-जवाबचा कार्यक्रम रंगला. याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नर्तीका दीप्ती आहेर हिने सादर केलेल्या ‘कोणता नवरा हवा तुजला’ या लावणीने टाळ्या, शिट्या मिळविल्या.

सुरेखा पुणेकर यांना अश्रू अनावर झाले!

मी राजसा तुम्हासाठी ग्रुपच्या सोनाली जळगावकर यांनी ‘कसं गाऊ मी तुमचे गुण, तुमचे माझ्यावर रून’, माझ्या कातड्याचा जोडा शिवावा, तुमच्या पायात हवा’.. ही लावणी सुरेखा पुणेकर यांच्यासाठी सादर केली. लावणी पाहताना पुणेकर यांना अश्रू अनावर झाले. पुणेकर आणि मेघा घाडगे दोघींनीही रंगमंचावर जात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. मी लावणीसाठी घरदार सोडून उभे आयुष्य दिले. कलाकारांकडून दाखल मिळाला. त्यामुळे माझा स्वाभिमान वाढला. माझ्या डोळ्यातून आनंदअश्रू आल्याचे पुणेकर म्हणाल्या.

सध्या लावणीबाबत जे काही चालले आहे. त्यावर प्रेक्षकांनी पडदा टाकावा. शासनाने लावणी, सवाल-जवाबचे महोत्सव जिल्हानिहाय भरविले पाहिजेत. ही कला मागे पडत चालली आहे असेही सुरेखा पुणेकर म्हणाल्या. लोककला जपण्यासाठी लावणी स्पर्धेचे आयोजन केल्याचे आमदार उमा खापरे, सुलभा उबाळे  यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघना एरंडे ( Chinchwad News) यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.