Chinchwad News : वाहतूक पोलिसांनी ‘लक्ष्मीदर्शना’ऐवजी कामावर लक्ष द्यावे – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – शहरातील चौकाचौकांमध्ये कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस केवळ लक्ष्मीदर्शन करण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाहतुकीला शिस्त राहिलेली नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी लक्ष्मीदर्शनाऐवजी कामावर लक्ष द्यावे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक म्हणाले.

याबाबत नाईक यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये वाहतूक पोलिसांचे समुपदेशन करायला हवे, असा सल्ला देखील नाईक यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक पोलिसांना जनतेशी सौजन्याने वागण्याचे वरिष्ठांनी आदेश द्यावेत. याबाबत त्यांचे समुपदेश करणे गरजेचे आहे. दंड वसूल करण्यावर भर देण्यापेक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. ‘शिस्त पाळा व दंड टाळा’, अशी वाहतूक पोलिसांची भूमिका असावी.

पोलिसांनी लक्ष्मीदर्शन सोडून कामावर लक्ष ठेवायला हवे. वाहतूक जनजागृतीसाठी प्रयत्न व्हायला हवा. सिग्नलची नियमित देखभाल, सिग्नल व झेब्रा क्रॉसिंग, पार्किंगसाठी जागा, वाहतूक विषयक नियमांचे फलक लावावेत.

चौकातील सिग्नलमुळे शहरातील वाहतूक नियंत्रित होते. मात्र, भर चौकात वाहतूक पोलीस आपल्या मोबईल फोनमध्ये व्यस्त असल्याचे निदर्शनास येते. यामुळे चौकातील वाहतुकीची शिस्त बिघडत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III