Chinchwad News: समाजमाध्यमांचा समाजोपयोगी वापर ही सकारात्मक बाब! – श्रीकांत चौगुले

एमपीसी न्यूज – समाजमाध्यमांच्या वापराबाबत नकारात्मकता वाढीस लागली असताना, समाजमाध्यमांचा समाजोपयोगी आणि साहित्यप्रसारासाठी वापर ही सकारात्मक बाब आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिराजवळील नवरात्र महोत्सवात व्यक्त केले.

गतवर्षीच्या विजयादशमीपासून ‘दिलासा’ या व्हॉट्सअॅप समूहावर आठवड्यातील सातही दिवस वेगवेगळ्या सदरांच्या माध्यमातून लेखन आणि अभिवाचन करणाऱ्या साहित्यिक आणि कलाकारांचा शब्दधन काव्यमंचाच्या वतीने सत्कार करताना श्रीकांत चौगुले बोलत होते.

लेखकांना लेखनाचे विषय देऊन एक वर्षाच्या कालावधीत नियमितपणे लेखन करून घेण्याची कौशल्यपूर्ण जबाबदारी समूहप्रमुख सुरेश कंक यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. या अभिनव उपक्रमांतर्गत सोमवारी नंदकुमार मुरडे (चिंतन), मंगळवारी प्रदीप गांधलीकर (मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक), बुधवारी दत्ता गुरव (एक कवी वेश्यावस्तीत), गुरुवारी सुभाष चव्हाण (क्रांतिकारकांचा आत्मयज्ञ), शुक्रवारी सुरेश कंक (सिनेमाच्या आठवणी), शनिवारी रघुनाथ पाटील (आठवणींच्या सावल्या) अशा सदरांचे लेखन करण्यात आले.

प्रत्येक आठवड्याला एक विषय देऊन त्यावरील लेख आणि एक निसर्गचित्र प्रदर्शित करून त्यावरील कवितांचे लेखन करण्यासाठी समूहावरील सदस्यांना आवाहन करण्यात आले. प्रत्येक रविवारी संकलित झालेल्या लेख तसेच कवितांचे विश्लेषण अनुक्रमे वर्षा बालगोपाल आणि निशिकांत गुमास्ते यांनी केले. याशिवाय या उपक्रमात ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांनी क्रांतिकारकांच्या जीवनावर काव्यरचना सादर केल्या.

ज्येष्ठ रंगकर्मी उज्ज्वला केळकर तसेच सानिका जोशी आणि आत्रेय गांधलीकर या विद्यार्थ्यांनी नियमितपणे काही सदरांचे अभिवाचन केले. या विजयादशमीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सांगता करताना सहभागी साहित्यिक-कलावंतांना ग्रंथप्रदान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

दिलासा समूहाच्या सदस्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.