Chinchwad crime News : पोलीस आणि वुमेन्स हेल्पलाईनच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा प्रयत्न फसला

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील विद्यानगर परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा प्रयत्न पोलीस आणि वुमेन्स हेल्पलाईनच्या सतर्कतेमुळे फसला. शुक्रवारी (दि.20) ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका करीत वधू व वराच्या नातेवाइकांना नोटीस बजावली.

याबाबत माहिती देताना वुमेन्स हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी म्हणाल्या, वुमन हेल्पलाईनला एका निनावी फोनद्वारे विद्यानगर परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न होत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार संस्थेच्या पदाधिकारी ॲड. सारिका परदेशी, अलका भास्कर, मंगला मुऱ्हे, वंदना पिल्ले, सारिका कांबळे यांनी तेथे धाव घेतली.

दरम्यान, याबाबत पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनाही याबबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या घरातच लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. घटनास्थळावरून पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मुलावर कोणतीच कारवाई केली नसल्याचे हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी याप्रकरणी तत्परतेने कारवाई केल्याचे वुमेन्स हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी सांगितले.

मात्र, स्थानिक पोलिसांनी याबाबत अधिक सहकार्य न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी होण्याच्या मार्गावर आहे, पण अजूनही शहरातील बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आले नाही, ही खेदाची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.