Chinchwad News: लॉकडाऊनमध्ये सुरक्षित बाप्पाचं विसर्जन करायचंय ! मग ही बातमी तुमच्यासाठी आहे

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. इतर सण उत्सवांप्रमाणे गणेशोत्सव देखील अतिशय साध्या पद्धतीने आणि काटेकोर शिस्तबद्धता पाळून साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मग अशा काळात घरच्या बाप्पाचं विसर्जन कसं करायचं? असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल. तर काळजी करू नका. कारण बाप्पाचं सुरक्षितपणे विसर्जन करण्यासाठी खास सोय शहरात उपलब्ध आहे.

शनिवारी (दि. 22) श्री गणेशाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. शहरात सर्वत्र आनंदाचे मंगलमय वातावरण आहे. लगेच आजपासून टप्प्याटप्प्याने विसर्जन देखील सुरू झाले आहे. प्रथा-परंपरेप्रमाणे काहींच्या घरी दीड दिवसाचे गणपती असतात, काहींच्या घरी पाच, काहींच्या घरी सात तर काहींच्या घरी दहा दिवसाचे गणपती असतात. त्यामुळे रविवारी (दि. 23) दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.

प्रशासनाने घरच्या घरी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. गणेशमुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे त्या पाण्यात विरघळत नाहीत. मग त्या इथे तिथे ठेऊन त्याची मोडतोड होण्याची तसेच कच-यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही जणांनी मुर्त्या घरात सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण काहींना घरच्या प्रथेप्रमाणे विसर्जन करावेच लागणार आहे.

गणेश विसर्जन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने मूर्ती दानाची संकल्पना दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील राबविण्यात येत आहे. थेरगाव येथील विसर्जन घाटावर संस्कार प्रतिष्ठानचे एक वाहन थांबवण्यात आले आहे. तर एक वाहन चिंचवड परिसरात फिरत आहे.

दरवर्षी विसर्जन घाटांवर स्वयंसेवकांच्या मदतीने संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने मूर्तीदान उपक्रम राबवला जातो. मात्र यावर्षी नदीघाटांवर विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे संस्कार प्रतिष्ठान मूर्तीदान उपक्रमातून मुर्त्या जमा करून त्याचे रविवारी संध्याकाळी विनोदे वस्ती येथे विसर्जन करणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी थेरगाव घाटावर मुर्त्या आणून द्याव्यात. तसेच एखाद्या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात मुर्त्या संकलित करून संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड (9511810085) यांच्याशी संपर्क केल्यास प्रतिष्ठानचे फिरते वाहन येऊन त्या मुर्त्या संकलित करेल, अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

रविवारी (दि. 23) दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मूर्ती दान उपक्रम सुरू राहणार असल्याचे डॉ. मोहन गायकवाड यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.