Chinchwad News : राज्यातील अगोदरच्या सरकारच्या आशीर्वादाने पिंपरी-चिंचवड शहरात कायदा-सुव्यवस्थेची वाट लागली – अजित पवार

पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांचा घणाघात

एमपीसी न्यूज – राज्यातील अगोदरच्या सरकारच्या आशीर्वादाने पिंपरी-चिंचवड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली होती. त्यासाठीच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांतच पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या बदल्या केल्या. विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वीच पोलीस आयुक्तांना ‘शहरात दहशत माजवणाऱ्या कुणाचीही गय करु नका’, अशा सूचना दिल्या असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात प्रचार मेळावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड, आझमभाई पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आदी उपस्थित होते.

पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप होणार नाही

अजित पवार म्हणाले की, चांद्यापासून बांद्यापर्यंत कायदा आणि व्यवस्था व्यवस्थितच राहिली पाहिजे. यासाठी महाविकास आघाडी सरकार ठोस उपाययोजना करीत आहे. आपल्या आया-बहिणींची इज्जत सुरक्षित राहिली पाहिजे. कुणावरही अत्याचार होता कामा नये. सर्वांना सुरक्षित वाटले पाहिजे. त्यासाठी पोलीस दलाबाबत आदरयुक्त भीती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुभा दिली आहे. त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही.

आचारसंहिता संपल्यानंतर पालिकेतील अधिका-यांना देणार सूचना

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. बहुमताच्या जोरावर भाजपा सभागृहात काही विषय रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक ठिकाणी रस्ता ताब्यात नसताना कामे सुरू केली आहेत. त्याबाबत आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहिता संपल्यानंतर सूचना देणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर प्रत्येक आठवड्याला पिंपरी-चिंचवडमधील आढावा घेणार आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचेही पवार म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारची पहिलीच निवडणूक, कुणीही गहाळ राहू नका

राज्यात पाच ठिकाणी विधान परिषद (पदवीधर आणि शिक्षक) निवडणूक होत आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या सर्व ठिकाणी महाविकास आघाडी एकोप्याने काम करीत आहे. महाविकास आघाडीतील सरकारची पहिली निवडणूक आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आहेत. विरोधकांनी अरुण लाड नावाचे डमी उमेदवारही उभे केले आहेत. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी गहाळ राहू नये. गेल्यावेळी अपयश आले आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न राज्य सरकारशी संबंधित असतात. त्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीतील उमेदवारांना मदत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.