Chinchwad news: डी मार्टला तांदूळ आणि वेगवेगळे पीठ विकण्याच्या बहाण्याने महिलेची 30 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – डी मार्टला वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे पीठ विकून पैसे कमावण्याचे अमिश दाखवून चार जणांनी मिळून एका महिलेची 29 लाख 80 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार जुलै ते 23 ऑक्टोबर 2021 या कालावधीत स्पाईन रोड, चिखली येथे घडला.

मनीषा भगवान घाडगे (वय 37, रा. स्पाईन रोड, चिखली) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अश्विनी ललित चौधरी (रा. चिंचवड), ललित विश्वनाथ चौधरी, निकिता समाधान पाटील, समाधान भागवत पाटील (रा.बिजली नगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना व्यवसाय करण्याचे अमिश दाखवले. होलसेल दरामध्ये वाडा, कोलम तांदूळ, उडीद पापड, तूर डाळ, ढोकळा पीठ, काळे उडीद डाळ, पांढरी उडीद डाळ खरेदी करायची आणि ती डी मार्टला विकायची. त्यातून पैसे कमावू असे आरोपींनी फिर्यादी महिलेला अमिश दाखवले. तसेच आरोपींनी डी मार्टच्या पर्चेसिंग ऑर्डर फिर्यादी यांना दाखवल्या. व्यवसायासाठी फिर्यादीकडून पैसे घेऊन महिलेची तब्बल 29 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.