Chinchwad News : आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – महिलांचा आर्थिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग सर्व पातळ्यांवर वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचा वेग शाश्वत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करू शकेल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) व कल्पतरू इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘यशस्वीनी पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बुधवारी (दि. 11) बोलत होते.

कृष्ण प्रकाश म्हणाले, “आज विविध क्षेत्रात महिला ज्या कार्तबगारीने कर्तृत्व सिद्ध करत आहेत. समाजसुद्धा त्यांची दखल घेत आहे. मात्र, या आधीच्या संपूर्ण जगाच्या इतिहासात जर आपण पाहिले तर महिलांना स्थानच दिले जात नव्हते, त्यांचे अस्तित्वच मान्य होत नव्हते.

आता मात्र परिस्थिती बदलत आहे. महिला सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत, असे सांगत यावेळी कृष्ण प्रकाश यांनी स्वतः लिहिलेली एक उर्दू भाषेतील कविता व गझल सादर केली.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उलेखनीय कामगिरी करणाऱ्या आठ महिलांना यावेळी कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते ‘यशस्वीनी पुरस्कार’ देऊन सन्मानितकरण्यात आले.

या पुरस्कार्थींमध्ये ओम नमो परिवर्तन परिवाराच्या प्रमुख आयुर्वेदाचार्य डॉ. वैशाली लोढा, क्रिमिनल लॉ क्षेत्रात कार्यरत असलेल्या अ‍ॅड. विजयालक्ष्मी खोपडे, औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापिका कविता कालीकर, औद्योगिक संबंध (इंडस्ट्रिअल रिलेशन) क्षेत्रातील हेमांगी धोकटे, 2019 मध्ये युक्रेन येथे आयोजित सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत विजेत्या ठरलेल्या सारिका कुलकर्णी, सध्या पुणे मेट्रोच्या अंडरग्राउंड विभागात कार्यरत असलेल्या एकमेव महिला सिव्हिल इंजिनिअर शिवानी पवार, मेमरी कोच व एनएलपी मास्टर अर्चना डोबा व आरोग्यम योगा संस्थेच्या संचालिका मुग्धा सरदेशपांडे या आठ महिलांचा ‘यशस्वीनी पुरस्कार’प्रदान करून सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक कल्पतरू इव्हेंट्सच्या संचालिका दीप्ती शेखावत यांनी केले. यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्सच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील यांनी आभार मानले.

सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी पवन शर्मा, संदीप गेजगे, अभिजित चव्हाण, शाम वायचळ व ज्ञानेश्वर गोफण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.