Chinchwad News : तरुणांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घ्यावी – विवेक डोबा

‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज: स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन दैंनंदिन जीवनव्यवहारात आदर्शांची जपणूक करण्याचा निर्धार करा. संस्कृती, दातृत्व आणि चारित्र्य या त्रिसूत्रीची जोपासना करून ध्येयप्राप्तीसाठी अविरत प्रयत्न करण्याचा दृढनिश्चय करावा, असे मार्गदर्शन व्याख्याते विवेक डोबा यांनी केले.

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) व विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी यांच्या चिंचवड शाखेच्यावतीने राष्ट्रीय युवादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डोबा बोलत होते.

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य हे समस्त मानवजातीसाठी कल्याणकारी होते. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आज सदविचारी लोकांच्या संघटनेची देशाला गरज आहे. यातूनच भावी पिढ्यांसाठी आपण सकारात्मक भविष्य निर्माण करू शकतो. कोरोनासारख्या संकटानेसुद्धा माणसांना एकमेकांना मदत करण्याच्या गरजेचे मोल पटवून दिले आहे.

भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या दैनंदिन आचरणात एकेक सकारात्मक बदल अंगिकारण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन विवेकानंद केंद्र चिंचवड शाखेच्या अरुणा मराठे यांनी केले.

राष्ट्रनिर्माण करण्यासाठी युवकांसह प्रत्येकानेच स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून प्रेरणा घ्यावी व स्वत:ला ध्येयवादी बनवावे, असे आवाहन यशस्वी एजुकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले.

कैवल्य बावडेकर व तनय सुतार या विद्यार्थ्यांनी ‘हे वीर विवेकानंद’ गीत सादर केले. यावेळी यशस्वी संस्थेच्या शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. सुनीता पाटील व संस्थेचा अध्यापक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी पवन शर्मा, प्रा. महेश महाकाळ, अभिजित चव्हाण, आदिती चिपळूणकर आदींनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.