Chinchwad News: प्रधानमंत्री आवास योजनेत 2022 पर्यंत सर्वांना घर देण्यासाठी सरकार कटिबध्द – प्रकाश जावडेकर

नागरिकाला केंद्र बिंदू मानून स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम करावे

एमपीसी न्यूज – गरिबांना सक्षम करण्यासाठी प्रत्येकाला घर, स्वच्छ जल, गॅस, शिक्षण, लसीकरण आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

तसेच सर्वसामान्य नागरिकाला केंद्र बिंदू मानून स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम केल्यास सर्वांचे जीवनमान उंचावणार असल्याचेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथील नियोजित प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत तसेच विविध ठिकाणच्या विकास प्रकल्पांचे ई-भूमिपूजन आणि लोकार्पण केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या हस्ते आज (शनिवारी) ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.

आमदार महेश लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर सुधारणा समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले, महापालिकेच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला चांगल्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. पण, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावा लागला.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावे असे आवाहन करून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देशातील ग्रामीण भागांमध्ये 2 कोटी घरे तर शहरी भागांमध्ये 70 लाख घरे बांधून देण्यात आली आहेत. लाभार्थींना मिळणारी स्वस्त घरे उत्तम असली पाहिजेत.

विविध योजनांचा निधी गरिब जनतेच्या जनधन खात्यात थेट जमा होत असून याचा जनतेला विशेष आनंद होत आहे. उज्वला योजने अंतर्गत देशातील 8 कोटी घरांमध्ये गॅस सिलेंडर पुरविण्यात आले आहेत. कोरोना विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी आत्तापर्यंत दीड कोटी जनतेला मोफत लस देण्यात आली आहे. आगामी काळात 65 वर्षांवरील सर्व तसेच 45 वर्षांवरील आजारी लोकांना सरकारी रुग्णालय मोफत लस दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षण सुरु केले त्यावेळी त्यांना समाज विरोध सहन करावा लागला. तरीही त्यांनी स्त्री शिक्षणाचा अट्टहास धरला. त्यामुळेच आज स्त्रिया सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. अशा सावित्रीबाई फुले यांच्या नावाने महापालिकेने स्मारक उभे केले आहे ही अभिमानाची बाब आहे.

मोठ्या शहरामध्ये निवांत जागी बसून लेझर शो पाहण्याची सुविधा शहरवासीयांना बर्ड व्हॅली येथे उभारण्यात येणा-या म्युझिक फाऊंटन व लेझर शो प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहे, असेही जावडेकर म्हणाले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महापालिका काम करीत आली आहे. सर्वसामान्यांसाठी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. हा सर्वसामान्यांसाठी आनंदाचा क्षण आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेची संगणकीय सोडत पारदर्शी असून हा प्रकल्प महापालिकेसाठी अभिमानास्पद आहे. हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण तसेच बर्ड व्हॅली संगीत व प्रकाशमय कारंजे प्रकल्प, पिंपळे सौदागर ते पिंपरी या दरम्यान नदीवर उभारण्यात येणा-या नवीन समांतर पूलाचे काम आणि वाकड रोड रत्नदीप कॉलनी ते भिंगारे कॉर्नर या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटिकरण कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1