chinchwad news: ‘हेरिटेज’चे काम सिमेंट काँक्रीटचे करावे – अश्विनी चिंचवडे

एमपीसी न्यूज – चिंचवडमधील हेरिटेजचे काम (Heritage work)  दगडी ( कोबल सरफेस ) न करता सिमेंट काँक्रीटचे ( Cement Concrete)  करावे. केवळ चौकामध्ये हेरिटेज धर्तीवर सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील ( shivsena  Corporator Ashwini Chinchwade) यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर ( Municipal Commissioner Shravan hardikar) यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात चिंचवडे यांनी म्हटले आहे की, चिंचवडमधील सर्व रस्त्यांची उंची डांबरीकरणामुळे वाढत आहे.

त्यामुळे आणि वारंवार खोदाईमुळे पाण्याची लाईन, विद्युत केबल, ड्रेनेज लाईन, स्ट्रॉमवॉटर लाईन, एमएनजीएल या सेवावाहिन्यांच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटीकरण करणे असे लेखाशीर्ष व तरतूद तत्कालीन आयुक्त आणि सर्व नगरसेवकांनी 2016-17 च्या अंदाजपत्रकात केली होती.

आपण आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर चिंचवड येथील हेरिटेज कामाची सिमेंट काँक्रिटीकरणाची फाईल दोन वर्ष प्रलंबित ठेवली. तसेच लखनऊच्या धर्तीवर दगडी कोबल सरफेस पद्धतीने विकसित करण्याबाबत निर्णय घेण्यात वेळ वाया घालवला.

तसेच निर्णय वेळेवर न घेता सुरुवातीपासून दगडी (कोबल सरफेस) कामाबाबत आपण आग्रही राहिलात. सर्व ठिकाणी दगडी (कोबल सरफेस) न करता फक्त चौका- चौकामध्ये दगडी काम (कोबल सरफेस) तसेच विद्युत विभाग वगळून अर्धवट निविदा प्रक्रिया केली. त्यामध्ये विद्युत कामाचा समावेश केला नाही. त्यामुळे चिंचवड मधील नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दुस-या टप्प्याची व विद्युतच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे लोकप्रतिनिधी व चिंचवडकर नागरीक त्रस्त झालो आहोत. त्यामुळे चिंचवडमध्ये कोबल सरफेस (दगडी काम ) न करता सिमेंट काँक्रिटीकरण करावे. केवळ चौकात हेरिटेज धर्तीवर सुशोभीकरण करण्यात यावे.

विद्युत पोल अँटिक, ऐतिहासिक पध्दतीचे बसवावेत. या कामाचा आठ दिवसात निर्णय घ्यावा; अन्यथा चिंचवडकरांना तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही नगरसेविका चिंचवडे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.