chinchwad News : विरोधी पक्षनेत्यांकडून महापौरांचा अवमान, त्वरित माफी मागा : कुंदा भिसे

एमपीसीन्यूज : जम्बो कोविड सेंटरमधील कर्मचा-यांचे वेतन दिले नसल्यामुळे कर्मचारी नाराज झाले. त्यांची नाराजी समजून घेण्यासाठी महापौर माई ढोरे यांनी कार्यतत्परता दाखवून मार्ग काढण्याच्या अनुषंगाने बुधवारी (दि. 21) जम्बो कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी महापौर ढोरे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याविषयी एक शब्द देखील उच्चारला नाही. मात्र, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी महापौरांवर खालच्या पातळीचे आरोप करुन त्यांचा अवमान केला. त्यांनी त्वरीत माफी मागावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षा कुंदा भिसे यांनी केली आहे.

याबाबत भिसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापौरांना पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम नागरिक संबोधले जाते. या पदाची एक विशेष गरिमा असून त्याचा मान ठेवणे शहरातील तमाम नागरिकांसह पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांचे सुध्दा कर्तव्य आहे.

जम्बो कोविड सेंटरमधील कर्मचा-यांचे वेतन दिले नसल्यामुळे कर्मचारी नाराज झाले. त्यांची नाराजी समजून घेण्यासाठी महापौर माई ढोरे यांनी कार्यतत्परता दाखवून मार्ग काढण्याच्या अनुषंगाने बुधवारी (दि. 21) जम्बो कोविड सेंटरला भेट दिली.

त्यांच्यासोबत पक्षनेते नामदेव ढाके आणि स्थायी समिती सभापती संतोष लोंढे हे देखील उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले असते तर कर्मचा-यांवर ही वेळ आली नसती, अशी चर्चा झाली.

यावरून महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी महापौरांवर खालच्या पातळीचे आरोप केले. ‘महापौरांचे काम म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशा शब्दांत मिसाळ यांनी आरोप केला. मुळात महापौर ढोरे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याविषयी एक शब्द देखील उच्चारला नाही. तरी देखील मिसाळ यांनी महापौरांवर असा आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे.

मिसाळ यांच्या आरोपाने महापौर पदाच्या गिरिमेला धक्का पोहोचला आहे. महापौर पदाला विशेष महत्व प्राप्त असते. महापौर हे पद शहरातले प्रथम नागरिक म्हणून गणले जाते.

या पदावरून महापौर ढोरे या पिंपरी-चिंचवडमधील 25 लाखांहून अधिक लोकांचे नेतृत्व करतात. त्यांच्याबाबत अशा शब्दांत टिका करणे म्हणजे महापौर पदाचा अवमान केल्यासारखे आहे. मिसाळ यांनी याबाबत त्वरीत माफी मागावी, अशी मागणी कुंदा भिसे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.