Chinchwad News: खासगी रुग्णालयांचे आयसीयू महापालिकेच्या नियंत्रणाखाली घ्या – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील सर्व खासगी रुग्णालयांचे आयसीयू विभाग महापालिकेच्या नियंत्रणाखाली घ्यावेत, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून, त्यातील गंभीर रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.

त्यामुळे महापालिकेने सर्व कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या युद्धपातळीवर नियोजन करून वाढविण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात महापालिका प्रशासन आणि कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन कमी पडत असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालये ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी गरजू रुग्णांकडून लाखो रुपये उकळू लागले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये गंभीर असलेल्या सामान्य रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.

ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या अधिकाराचा वापर करून शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमधील आयसीयू विभागांचे व्यवस्थापन महापालिकेने तातडीने स्वतःकडे घ्यावे, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.