Chinchwad : आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीचा आवाज घुमणार – चित्रा वाघ

एमपीसी न्यूज – राज्यातील पक्षाची ताकद ओळखून प्रत्येकाने साहेबांचे हात बळकट केले पाहिजे, कामे दुपटीने करा, आणि पुन्हा 2019 मध्ये राष्ट्रवादीचा आवाज घुमवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भाऊसाहेब भोईर मित्र परिवार आयोजित शरद पवार वाढदिवसानिमित्त नाट्य, कला व संगीत महोत्सवाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, सुनीता धुमाळ, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर आदी उपस्थित होते.

चित्रा वाघ म्हणाल्या, ” चार वर्षांत भाजपचे खरे स्वरूप दिसून आल्याने जनता वैतागली असून भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार तिने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादीच आहे. शहरात अत्याचार, गुन्हेगारी वाढत आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणा, महिला आयोग आणि महिला व बालविकास मंत्रीही असंवेदनशील आहेत. सत्तेत काम करणे व विरोधात काम करणे यामध्ये फार मोठा फरक आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधारी मंत्र्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही”

बसवराज पाटील म्हणाले, “आज आपण राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी सत्तेबाहेर आहोत,अशा वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पवार साहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले. सूत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.