Chinchwad : तीन पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हेगार एकाच दिवशी तडीपार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हिंजवडी, देहूरोड आणि सांगवी पोलीस ठाण्यातील नऊ सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिले आहेत.

हिंजवडी पोलिसांनी रवींद्र शिवाजी हांगे (वय 26, रा. गणेशनगर, थेरगाव), विकास अनिल वेताळ (वय 20, रा. पारखे वस्ती, हिंजवडी), अनिकेत भाऊसाहेब पवार (वय 22, रा. चिंतामणी चौक, चिंचवड), मुकेश विटकर (वय 20, रा. वाकड), नितीन रामभाऊ आवताडे (वय 32, रा. जगतापनगर, थेरगाव) यांना सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे.

देहूरोड पोलिसांनी लखन ऊर्फ निखिल बाबू आगळे (वय 30, रा. देहूरोड), आमीन जिंदावली पठाण खान (वय 20, रा. देहूरोड), डब्बू ऊर्फ हुसेन यासीन शेख (वय 25, रा. देहूरोड) यांना तडीपार केले आहे. तर सांगवीच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार बरकत ऊर्फ लल्या महंमद जमादार (वय 22, रा. जवळकर नगर, सांगवी) याला तडीपार केले आहे. वरील चार आरोपींना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

तडीपार केलेल्या सर्व गुन्हेगारांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने तसेच शहरात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना तडीपार केल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक बसला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.