Chinchwad: कोणतीही आंबेडकरवादी व्यक्ती माओवाद्यांचे समर्थन करत नाही – स्मिता गायकवाड

एमपीसी न्यूज – भारतातील माओवादी क्रांतीचे मूळ उद्दीष्ट हे भारतीय लोकशाहीला मानणा-या नागरिकांचा बुद्धीभेद करणारे आहे. आदिवासींमधून सकारात्मक विचारांचे नेतृत्व उभे राहत असेल तर नक्षलवादी, माओवादी बंदुकीच्या धाकाने अशा व्यक्तींना संपवत आहेत. दलित माओवादी बनत नसून माओवादीच दलितांचा टार्गेट म्हणून वापर करीत आहे. माओवादी हे दलित समाजात ‘आम्ही आंबेडकरवादी आहोत’ असे सांगतात आणि दुसरीकडे संविधान नाकारतात, हा माओवाद्यांचा दुटप्पीपणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायमच संसदीय मार्गाचा स्वीकार केला आहे. कुठलीही आंबेडकरवादी व्यक्ती माओवाद्यांचे समर्थन करत नाही, असे कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी सांगितले.

चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेचे हे 28 वे वर्ष आहे. तिसरे पुष्प गुंफताना कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी उपस्थितांशी स्लाईड-शो व्दारे संवाद साधला.

  • या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीमा देव, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, बाळासाहेब ढसाळ, सुहास पोफळे, गीतल गोलांडे, सुजाता पोफळे, शिल्पा वाघुले, हेमा सायकर, कविता शिंदे, प्रा. महादेव रोकडे, विजय भिसे, कैलास बहिरट, राजेंद्र घावटे, दिलीप बोंबले आदी उपस्थित होते.

यावेळी कॅप्टन स्मिता गायकवाड म्हणाल्या की, नक्षलवाद किंवा माओवाद हा गेल्या पन्नास वर्षांपासून देशाला पोखरत आहे. यावर अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही. नक्षलवाद आता गडचिरोलीपुरता मर्यादित नसून शहरापर्यंत तो फोफावला आहे. 31 डिसेंबर 2017 ला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर तथाकथित बुद्धीवाद्यांना अटक करण्यात आले. त्यांनतर पुन्हा माओवाद आणि नक्षलवादावर चर्चा सुरु झाली. नक्षलवाद आणि माओवाद यात फरक नाही.

  • शोषितांच्या, वंचितांच्या हक्कासाठी लढतो असे दाखविणारे हे माओच्या विचाराने काम करीत असतात. पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीत 1967ला उठाव झाला. तो प्रत्यक्ष सत्ता हस्तगत करण्यासाठी होता. हे त्यांच्याच दस्तऐवजामधून दिसते. आदिवासींना जमिनी मिळवून देणे हे त्यांचे उद्दिष्ट नसून मतदानाऐवजी बंदुकीच्या जोरावर सत्ता हस्तगत करायची, अशी शिकवण माओची आहे. आदिवासींसाठी माओवाद नसून उलट आदिवासी कायम माओवादासाठी वापरले जातात, असेही त्या म्हणाल्या.

कविता शिंदे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सुजाता पोफळे व आभार हेमा सायकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.