Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच वटपौर्णिमेला सोनसाखळी चोरीची एकही नोंद नाही

एमपीसी न्यूज – वटपौर्णिमा, मकर संक्रांती हे सण चोरट्यांसाठी दिवाळी घेऊन येणारे सण ठरतात. या दिवशी महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. आजवर प्रत्येक वटपौर्णिमेला सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पहिल्याच वटपौर्णिमेला हा इतिहास बदलला असून यावर्षी वटपौर्णिमेला शहरात साधा फुटका मणी हिसकावल्याची देखील नोंद नाही. शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांनी हे आव्हान शंभर टक्के यशस्वी केले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची पहिली वटपौर्णिमा रविवारी (दि. 16) पार पडली. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी स्वतः यावर्षी सोनसाखळी चोरीच्या घटना घडू नये यासाठी लक्ष घातले. सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांना रस्त्यावर आणले. त्यामुळे वटपौर्णिमेच्या सणाला पोलिसांचे कडेकोट पोलीस संरक्षण मिळाले. पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले. परिणामी शहरातील सर्व पोलीस ठाणी रविवारी ओस पडली होती. प्रत्येक महिलांच्या बरोबरीने पोलीस कर्मचारी चालत होते. या व्यतिरिक्त काही महिला पोलिसही साध्या वेशात दागिने घालून तैनात करण्यात आल्या होत्या.

वटपौर्णिमेच्या दिवशी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेटचा सामना होता. त्यामुळे नागरिक, तरुण व सर्व क्रिकेटप्रेमी टीव्हीसमोर बसले होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. या शुकशुकाटाचा चोरटे फायदा घेण्याची जास्त शक्यता होती. त्यामुळे आयुक्त पद्मनाभन यांनी शहरातून बाहेर पडणारे सर्व मुख्य रस्ते, मोठे चौक आणि वड पूजनाची ठिकाणे या परिसरात तगडा बंदोबस्त दिला होता. रस्त्यावर पोलीस दिसला की, चोरटे धाडस करणार नाहीत अशी खात्री आयुक्त पद्मनाभन यांना वाटत असल्याने त्यांनी सर्व पोलीस दलच रस्त्यावर उतरवले होते.

मागील वर्षी देखील मंगळसूत्र हिसकावल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यासाठी तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, तरी देखील चोरटयांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून मंगळसूत्र हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.