Chinchwad : घरफोडी करणा-या सराईताकडून पाच लाखांचे दागिने जप्त

गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी; पाच घरफोडीचे गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणा-या एका अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 5 लाख 13 हजार 645 रुपये किमतीचे 155.65 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केली. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन, सांगवी आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सुनील मल्हारी तलवारे (वय 28, रा. रेल्वे स्टेशन जवळ, कान्हेफाटा, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार सुनील तलवारे हा त्याच्या पत्नीसह कान्हेफाटा येथे भाडयाच्या खोलीत राहत आहे. अशी माहिती पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांना मिळाली. त्यानुसार कान्हे फाटा येथे सापळा रचून सुनील याला ताब्यात घेतले.

त्याला गुन्हे शाखा युनिट दोन येथे आणून कसून चौकशी केली असता त्याने सांगवी, वाकड आणि वडगाव मावळ परिसरात घरफोडी चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी 5 लाख 13 हजार 645 रुपये किमतीचे 155.65 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन, सांगवी आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी लक्ष्मण आढारी, नारायण जाधव, प्रवीण दळे, संजय गवारे, हजरत पठाण, मोहम्मद गौस नदाफ, फारुख मुल्ला, संदीप ठाकरे, दत्तात्रय बनसुडे, तुषार शेटे, नितीन बहिरट, मयूर वाडकर, राहुल खारगे, किरण आरुटे, धर्मराज आवटे, धनराज किरनाळे, चेतन मुंडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.