_MPC_DIR_MPU_III

Chinchwad : वर्षभरात तब्बल एक हजार मोटारसायकल चोरीला

एमपीसी न्यूज – मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरातून एक हजार 54 मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मोटारसायकल चोरणा-या अज्ञात चोरट्यांना पकडण्यात देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांना अपयशच आले आहे. वाहन चोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. तरी देखील मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण सहा टक्क्यांनी घटले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

एक जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात 2 हजार 21 चोरीचे गुन्हे पोलीस दप्तरी दाखल आहेत. त्यातील केवळ 369 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अर्ध्याहून अधिक गुन्हे हे फक्त मोटारसायकल चोरीचे आहेत. मागील अकरा महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून एक हजार 54 मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. त्यातील केवळ 162 गुन्ह्याचा तपास पोलिसांना लावता आला आहे. तीनचाकी वाहने चोरीला गेल्याचे 26 तर चारचाकीचे 110 गुन्हे दाखल आहेत.

चोरीचे गुन्हे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी आहेत. पण गुन्हे उघडकीस आणण्याची टक्केवारी देखील कमीच आहे. सर्व प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांची केवळ 18 टक्के उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. हेच प्रमाण मागील वर्षी 24 टक्के होते. दररोज सरासरी दोन ते तीन वाहने चोरीला जात आहेत. मधील दोन महिन्यांच्या कालावधीत महागड्या कार चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यासाठी पोलीस आयुक्तालयात वाहन चोरी विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली. मात्र, अनेक अडचणींच्या गर्तेत अडकलेल्या आयुक्तालयात काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

_MPC_DIR_MPU_II

चोरीच्या प्रकारांना रोखण्यासाठी स्मार्ट पोलिसिंग आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. मात्र, चोरटे पोलिसांचा आणि नागरिकांची नजर चुकवून वाहने चोरून नेत आहेत. विशेषतः तरुण वयातील मुले अशा प्रकारचे गुन्हे करण्याकडे वळली आहेत. बहुतांश गुन्ह्यांमध्ये वय वर्ष 30च्या आतील मुले चोरीचे प्रकार करीत असल्याचे समोर आले आहे. शाळाबाह्य, बेरोजगार तरुण तसेच मौजमजा करण्यासाठी देखील वाहनचोरी केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात गुन्हे शाखेने तीन वाहन चोरट्यांना अटक केली. त्यांनी चक्क आपल्या प्रेयसीला फिरवण्यासाठी 14 दुचाकी चोरल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. त्यामुळे स्मार्ट पोलिसिंग सोबत तरुणांच्या समाजस्वास्थ्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.

एक जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत चोरीचे दाखल गुन्हे –

दुचाकी चोरी – 1054
तीनचाकी चोरी – 26
चारचाकी चोरी – 110
सायकल चोरी – 42
वाहनांचे पार्ट चोरी – 14
कॉपर वायर चोरी – 08
पॉकेट चोरी – 01
इतर चोरी – 766

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.