Chinchwad : मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

एमपीसी न्यूज- पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. ही घटना वाल्हेकरवाडी चिंचवड येथे शनिवारी (दि. 5) रात्री घडली.

अमित सुभाष पोटे (वय 27, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणी मयूर लोखंडे, पंकज जगताप, किशोर इंगळे आणि जहीद मुजावर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज दिलीप जगताप (वय 25, रा. चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुजावर आणि फिर्यादी यांच्यात पूर्ववैमनस्य होते. या कारणावरून शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास चिंचवडे कॉलनी वाल्हेकरवाडी येथे आरोपींनी आपसात संगनमत करून कोयते घेऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी आले. त्यावेळी तिथे असलेल्या फिर्यादी यांचा मित्र अमित पोटे हा फिर्यादी यांना वाचवण्यासाठी भांडणामध्ये पडला.

यावेळी चिडलेल्या आरोपींनी पोटे यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पोटे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी रात्री उपचारादरम्यान पोटे यांचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.