Chinchwad : अवयवदान ही काळाची गरज -डॉ. वैशाली भारंबे

एमपीसी न्यूज – रक्तदान आणि नेत्रदानाबाबत जनजागृती झाल्यामुळे नागरिक स्वयंस्फूर्तीने रक्तदान आणि नेत्रदान करण्यासाठी पुढे येत आहेत. अशीच जनजागृती अवयवदानाबाबत झाली तर देशभरात हजारो नागरिकांचे प्राण वाचतील. देशाचा आरोग्य आलेख उंचावेल, यासाठी अवयवदान ही काळाची गरज आहे, असे मत डॉ. वैशाली भारंबे यांनी व्यक्त केले.

चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेचे हे 28 वे वर्ष आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. भारंबे बोलत होत्या. यावेळी उद्‌घाटक मल्लीका तारके, ॲड. ज्योती सोरखडे, सुजाता पोफळे, गीतल गोलांडे, चैताली चोपडे, हेमा सायकर, कविता शिंदे, राजाभाऊ गोलांडे, गजानन चिंचवडे, सुहास पोफळे, भास्कर रिकामे, महेश गावडे, उत्तम दंडिये आदी उपस्थित होते.

  • यावेळी डॉ. भारंबे म्हणाल्या की, मेंदू मृत झालेली कोणतीही व्यक्ती किंवा हृदय बंद पडलेली व्यक्ती अवयव दान करू शकते. त्यासाठी त्या व्यक्तीने अगोदर अवयव दानाचे अर्ज भरून दिलेले असावेत किंवा त्यांच्या वारसदारांची अवयवदानाची इच्छा असावी. वैद्यकिय क्षेत्रात झालेल्या संशोधनामुळे आता मेंदूसोडून शरीरातील बहुतांशी अवयव दान करता येतात.

किडनीदान, त्वचादान, नेत्रदान, हृदयदान करण्यात आल्याच्या अनेक घटना आपण माध्यमातून वाचत असतो. माणसाचे यकृत दान करताना यकृताचा काही भाग कापून गरजू व्यक्तीला प्रत्यारोपण केला जातो. ज्या व्यक्तीचे यकृत कापले आहे तो भाग पुढील सहा महिन्यात शरीरात पूर्ववत तयार होतो. त्यामुळे यकृत दान करणा-या व्यक्तीला कोणतीही इजा होत नाही. हे रक्तदान करण्यासारखे सोपे व सुटसुटीत प्रत्यारोपण आहे.

माणसाच्या मृत्युनंतर त्याच्या शरीरातील अवयवांचे दान केल्यास ते इतरांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगाचे ठरते. कोणाचेतरी प्राण वाचविण्यामध्ये आपला हातभार लागू शकतो. त्यामुळे ‘मरावे परी, अवयवदान रूपी उरावे’ ही संकल्पना नागरिकांमध्ये रुजवणे आवश्यक आहे, मृत्यूनंतर सहा तासांत त्वचा दान करता येते त्यासाठी त्वचा बँकेशी संपर्क करावा, अशीही माहिती डॉ. भारंबे यांनी दिली.

  • स्वागत गीतल गोलांडे व प्रास्ताविक शिल्पा वाघुले यांनी तर, सूत्रसंचालन वैशाली खोले यांनी केले. आभार सुजाता पोफळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.